लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला: अकोट येथील एका ग्राहकाने फेब्रवारी महिन्यापासून एकदाही वीज बिल भरले नाही. उलट आठ हजार ७३० रुपयाच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी घरापर्यंत आलेल्या अभियंत्याला सहकार्य करण्याचे सोडून त्यांच्याशी हुज्जतबाजी करत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी विजय मंडाले याच्यावर अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. ग्राहकांनी महावितरणला सहकार्य न करता कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला.

जिल्ह्यात लघुदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून पुढील आठ दिवसात ३१ कोटी रुपये वसूल होणे गरजेचे आहे. ग्राहक वीजबिल भरण्याला प्रतिसादच देत नसले तर त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देत जिल्ह्यात उपविभागानुसार वीजबिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल वसुलीच्या या मोहिमेदरम्यान खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा संपूर्ण थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्काचे २५३ रूपये अतिरिक्त भरल्याशिवाय वीज पुरवठा पुर्ववत न करण्याचे निर्देशही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच संपूर्ण थकीत वीज बिल भरून सहकार्य करण्यात आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

आणखी वाचा-अकोला: ‘जलयुक्त’तून १३१ गावांमध्ये १३१.७० कोटींची कामे होणार

आठ दिवसात ३३ कोटी वसुलीचे आव्हान

एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या एकूण ७१ कोटीच्या वीजबिलापैकी मागील २२ दिवसात फक्त ३८ कोटी रूपयाच्या वीजबिलाची वसुली झाली आहे. त्यामुळे महावितरणला पुढील आठ दिवसात ३३ कोटी रूपयाचे वीजबिल वसुल करावे लागणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity bill was not paid and the engineer was also beaten up ppd 88 mrj