भंडारा : सध्या व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वार्षिक व्याघ्र गणना सुरू आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. यादरम्यान युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ असणाऱ्या प्राण्याची कोका वनपरिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे सुमारे १,८९४.९० किमी. इतक्या विस्तृत क्षेत्रावर पसरलेले असून त्याचा विस्तार गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आहे. सध्या व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅप च्या माध्यमातून वार्षिक व्याघ्र गणना सुरू आहे व त्यासाठी प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. यादरम्यान युरेशियन पाणमांजर या दुर्मिळ प्राण्याची कोका वनपरिक्षेत्रात पहिली छायाचित्रणात्मक नोंद झाली. सदर नोंद ही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व संलग्न भूप्रदेशात या युरेशियन ऑटर (युरेशियन पाणमांजर) या प्रजातीचा पहिलाच छायाचित्रणात्मक पुरावा आहे.
चॅम्पियन आणि सेठ यांच्या भारतीय जंगलांच्या वर्गीकरणानुसार, हे क्षेत्र उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वन या वर्गात येते. निरोगी उभयचर पर्यावरणाचे सूचक म्हणून काम करून गोड्या पाण्यातील आणि किनारी परिसंस्था राखण्यात पाणमांजर महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात पाणमांजराच्या तीन प्रजाती आढळतात. तीनही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२, अनुसूची १ अंतर्गत संरक्षित आहे आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ द्वारे धोकाग्रस्त असे वर्गीकृत आहे.
नवेगाव नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत वन्यजीव जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत अंकित ठाकूर यांनी क्षेत्र संचालक जयरामेगौडा आर. आणि उपसंचालक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनाखाली व्याघ्र गणनेच्या फेज-४ चे सर्वेक्षण आणि विश्लेषण केले.
© The Indian Express (P) Ltd