विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना दोन गुन्ह्य़ांची माहिती दडविल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची विनंती करणारा अर्ज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणी करताना न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. एम. सातव यांनी फडणवीस यांना २४ जानेवारीला व्यक्तीश: हजर राहण्याचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाखल गुन्ह्य़ांची माहिती दडवून फडणवीस यांनी मतदारांची फसवणूक केली आणि निवडणूक जिंकली, असा आरोप करणारा अर्ज सतीश उके यांनी न्यायालयात केला आहे. गेल्या दोन सुनावण्यांच्या वेळी ते गैरहजर होते. आज शनिवारी न्यायदंडाधिकारी सातव यांच्यासमक्ष सुनावणी झाली असता फडणवीसांतर्फे एक अर्ज दाखल करून अनुपस्थित राहण्याची मुभा मागण्यात आली. यावेळी राज्यात अवकाळी पाऊस झाला असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत व शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. शिवाय जिल्हा परिषद निवडणुका असून त्यांची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर असल्याने ते राज्यभरात फिरत आहेत. या बाबी समजून त्यांना सुनावणीला अनुपस्थित राहण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने हा अर्ज ग्राहय धरला व सुनावणी २४ जानेवारीला ठेवली. पण, २४ जानेवारीला कोणतेही कारण ऐकण्यात येणार नाही व फडणवीस यांना उपस्थित राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. फडणवीस यांच्यातर्फे अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगांवकर यांनी बाजू मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis order to appear in court abn