अकोला : बनावट नोटा चलनात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ५०० रुपयांच्या दोन नोट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तुमच्याकडची ५०० रुपयांची नोट बनावट तर नाही ना? याची खातरजमा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अकोट शहरात एका महिलेने दुकानदाराला बनावट ५०० रुपयांच्या दोन नोट देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला. जिल्ह्यात बनावट नोटा चलनात असल्याची चर्चा रंगली आहे. समाज माध्यमावर हा प्रकार चांगलाच प्रसारित झाला.

बनावट नोटा छापून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. खऱ्या नोटे प्रमाणेच बनावट नोट तयार करून ती चलनात आणण्याचे प्रकार आरोपींकडून होतात. असाच एक प्रकार अकोट शहरात उघडकीस आला. पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा महिलेने किराणा दुकानदारास दिल्या. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर या नोटा नकली असल्याचे समजले. शहरातील नरसिंग मार्गावर असलेल्या श्रीराम शॉपीमध्ये एक अनोळखी महिला स्कॉर्फ बांधून वीज खंडित असताच्या वेळात सामान खरेदी करण्यासाठी आली. सामानाची खरेदी झाल्यानंतर पैसे देताना ५०० च्या दोन नोटा दुकानदारास देऊन निघून गेली. थोड्या वेळाने या नोटांचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या बनावट असून, आपल्याला महिलेने गंडवल्याचे दुकानदारास लक्षात आले. या बाबत समाज माध्यमावर या दोन नोटांचे छायाचित्र प्रसारित करून व्यापाऱ्यांनी अशा महिलांकडून सावध राहण्याचे आवाहन इतर व्यापाऱ्यांना केले आहे.

बनावट नोटा कशा ओळखायच्या?

बनावट नोटा ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. पैशांमध्ये एखादी नोट बनावट आहे की खरी हे कसे ओळखायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. बनावट नोटा या पहायला गेलं तर अगदी खऱ्या नोटांसारख्याच असतात आणि त्यामुळेच त्यांची ओळख पटवणे कठीण असते. बँकेत पैसे जमा करायला गेल्यावर नोटा बनावट असल्याचे बँकेतून समजते. ५०० रुपयांच्या नोटांचा वापर जास्त होऊ लागला आहे. ज्यामुळे बनावट नोटा बनवणाऱ्यांनीही ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली. नोट खरी की बनावट हे ओळखण्यास मदत करणारी वैशिष्ट्ये असतात. पडताळणीसाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाऊ शकते. खऱ्या नोटांवरील काही वैशिष्ट्यांमध्ये उंचावलेला प्रिंट वापरला जातो आणि स्पर्शास थोडासा खडबडीत वाटला पाहिजे. रेषा आणि प्रिंट तीक्ष्ण आणि स्पष्ट असावेत आणि कडा अस्पष्ट नसाव्यात. रंग स्पष्ट आणि वेगळे असावेत, अस्पष्ट नसावेत.