नागपूर विमानतळ संचालित करीत असलेल्या मिहान इंडिया लि.ची अव्यावसायिकता प्रवाशांच्या मुळावर उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खर्च कपातीकरिता विमानचालनअग्निशमन (एव्हीएशन फायर) या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून येथील सर्व महत्त्वाच्या पदांवर सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. यामुळे येत्या महिनाभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची अग्निशमन सुरक्षा थरथरत्या हातात जाणार आहे.

विमानतळावर किती मोठय़ा आकाराची विमाने उतरवायची हे तेथील अग्निशमन सुसज्जतेवर अवलंबून असते. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांची असते. विमानतळावरील अग्निशमन यंत्रे, विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा अनुभव यावरून विमानतळाची श्रेणी निश्चित केली जाते. त्यानुसार विमान संबंधित विमानतळावर उतरत असतात. आपत्कालीन स्थितीत देखील विमानतळजवळ आहे म्हणून तेथे कोणतेही विमाने उतरवले जात नाही, तर अग्निशमन यंत्रणेची सुसज्जता पाहूनच याबाबत निर्णय घेतला जातो. नागपूर विमानतळ सातव्या श्रेणीत येते. ‘कॅटेगिरी सेव्हन’ या श्रेणीतील विमानतळावर अग्निशमन सेवेच्या ताफ्यात किमान ६२ ते ६५ अधिकारी-कर्मचारी असणे आवश्यक आहे, परंतु नागपूर विमानतळावरील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अध्र्यावर आली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च परवडत नसल्याने एक वर्षांच्या कंत्राटावर अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहे. यातील सर्व महत्त्वाच्या पदावर ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ जुलैला मुलाखती झाल्या. ‘एएआय’च्या सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी या मुलाखतीला हजर होते. सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ अधीक्षक, अधीक्षक आदी पदांवर सेवानिवृत्त व्यक्ती नेमण्यात येत आहेत.

विमानचालन अग्निशमन (एव्हीएशन फायर) सेवेत महत्त्वाच्या पदावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. सरसकट सर्व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना घेण्यात येणार नाही. केवळ सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती एक वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. नुकताच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुण मुलांना देखील घेण्यात येत आहे. ते अनुभवी झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ते जागा घेतील. जेएमआर आणि जीव्हीके या कंपन्यांनी विमानतळ चालविण्यासाठी घेतले तेव्हा अशाप्रकारची व्यवस्था केली.   – व्ही.एस. मुळेकर, वरिष्ठ संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर