४२ हजार लसींची पहिली खेप आली; १५ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था

नागपूर : करोना महामारीची प्रचंड झळ सहन करणाऱ्या नागपूरकरांसाठी एक आनंदवार्ता आहे. ४२ हजार करोना प्रतिबंधित लस राज्य शासनाने पाठवल्या असून बुधवारी मध्यरात्रीनंतर त्या नागपुरात दाखल झाल्या. १६ जानेवारीपासून शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाला सुरुवात होणार आहे

विविध जिल्ह्य़ांसाठी लस घेऊन कंटेनर निघाले आहेत. नागपुरात बुधवारी मध्यरात्रींतर ते आरोग्य उपसंचालक कार्यालयात पोहोचले. विभागातील सहाही जिल्ह्य़ांसाठीची लस येथे तयार करण्यात आलेल्या के ंद्रीय शीतगृहात ठेवण्यात येईल. त्यानंतर  गुरुवारपासून वाटप सुरू होईल. यासाठी एक चमू तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. राज्य शासनाकडून  नागपूर जिल्ह्य़ासाठी ४२ हजार लस पाठवण्यात आल्या आहेत. १५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. जिल्ह्य़ात लस ठेवण्यासाठी एकूण १९४ शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली असून महापालिकेची त्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, असे  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी   सांगितले.

महापालिकेकडे लसीसाठी २४ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी नोंद झाली असून  ग्रामीण भागातील १२,५०० कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंद केली आहे. शहरात पहिल्या दिवशी पाच तर ग्रामीण भागात १० केंद्रांवर लसीकरण सुरू होईल. त्यानंतर महापालिको ही संख्या ६० केंद्रांपर्यंत वाढवणार आहे. ग्रामीण भागातही सध्या १५ केंद्रांवर याची तयारी करण्यात आली  आहे. विशेष म्हणजे, लस पूर्णत: नि:शुल्क आणि ऐच्छिक आहे. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या २४ तास अगोदर ‘एसएमएस’वरून केंद्राची माहिती, वेळेची माहिती दिली जाईल. यासाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महापालिका व महसूल कर्मचारी व तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे.

विदर्भासाठी मात्रा

जिल्हा           संख्या

नागपूर          ४२ ०००

अमरावती      १७०००

अकोला          ९०००

बुलढाणा        १९०००

गडचिरोली     १२०००

गोंदिया         १०,०००

वर्धा              २०,५००

यवतमाळ   १८,५००

चंद्रपूर          २०,०००

वाशीम          ६,५००

लसीकरणासाठी महापालिके ची यंत्रणा सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.

– दयाशंकर तिवारी, महापौर.