यवतमाळ : वनविभागाच्या वतीने वनरक्षक (गट क) पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत धाव चाचणीत चक्क ‘डमी’ उमेदवार धावल्याची बाब उघडकीस आली आहे. वनरक्षकाच्या पदासाठी पात्र ठरल्यावर दस्तऐवज तपासणी करण्यात आली. त्यात ‘सीसीटीव्ही’मुळे ही तोतयागिरी उघड झाली. याप्रकरणी गुरुवारी रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या तक्रारीनंतर वनरक्षक पदासाठी अर्ज करणारा मूळ उमेदवार रवींद्र सोमनाथ पायगव्हाण (२८, रा. पळाशी, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि डमी उमेदवार प्रदीप राजपूत (२६, रा. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी रवींद्र पायगव्हाण याला अटक करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात वनरक्षकाच्या ५५ जागांसाठी राज्यभरातून ११ हजारापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. नोकरी बळकावण्यासाठी रवींद्र सोमनाथ पायगव्हाण याने पाच किलोमीटर धावण्याच्या चाचणीत प्रदीप राजपूत याला डमी उमेदवार म्हणून उभे केले.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा… “

वनविभागातील वनरक्षकपदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा टीसीएसआयओएनमार्फत २ ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेण्यात आली. ५ जानेवारी २०२४ रोजी वनविभागाच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात आला. पुढील टप्प्याची प्रक्रिया राबवण्यासाठी वनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी प्रादेशिक निवड समितीचे सचिव म्हणून यवतमाळ वनसंरक्षकांना प्राधिकृत केले. ऑनलाईन परीक्षेत १२० पैकी ४५ टक्के गुण प्राप्त असणाऱ्या उमेदवारांची २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत दस्तऐवज तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी तसेच धाव चाचणी घेण्यात आली. परीक्षेतील गुण व धावचाचणीमधील वेळेनुसार प्राप्त गुणांची एकत्रित बेरीज करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची २१ फेब्रुवारी रोजी चाचणी घेण्यात आली. पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे पाठवण्यात आले.

रवींद्र पायगव्हाण याचा भरती प्रक्रियेतील गुणवत्तेनुसार निवड यादीतील सर्वसाधारण प्रवर्गात समावेश करण्यात आला होता. दस्तऐवज तपासणी व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पाच किलोमीटर धावणारा उमेदवार हा डमी निघाला. खोटे कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे निवड समितीच्या लक्षात आले. त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी अमर नरेंद्र सिडाम (रा. यवतमाळ) यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रवींद्र पायघन व त्याचा मित्र प्रदीप राजपूत या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला.

हेही वाचा – बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….

रवींद्र याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मावसकर करीत आहेत.