अमरावती : मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागांतर्गत धामणीखेडा बिटमध्ये गस्तीवर असलेल्या एका वनमजुरावर वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. प्रेम मुन्ना कासदेकर (वय ३०) असे मृत मजुराचे नाव असून, त्याच्यासोबत असलेला त्याचा सहकारी आकाश कासदेकर सुदैवाने बचावला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगामल वन्यजीव विभागातील खोंगडा वर्तुळात राजदेवबाबा कॅम्प आहे. या कॅम्पवर वनरक्षक आणि वनमजूर जंगलाची पाहणी करण्यासाठी मुक्कामी राहतात. प्रेम कासदेकर आणि आकाश कासदेकर हे दोघेही गेल्या तीन महिन्यांपासून या कॅम्पवर रोजंदारीवर काम करत होते. मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून ते दोघेही धामणीखेडा बिटमधील कंपार्टमेंट क्रमांक ९४४ मध्ये गस्तीसाठी गेले होते. दिवसभर त्यांनी कालिकुंडी कॅम्प आणि धामणीखेडा बिटची पाहणी केली.

सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते दोघेही परत राजदेवबाबा कॅम्पकडे येत होते. काही वेळानंतर आकाशने मागे वळून पाहिले असता प्रेम दिसला नाही. त्याने प्रेमला आवाज दिला, आजूबाजूला शोधले, पण तो सापडला नाही. अंधार झाल्यामुळे काहीच दिसत नसल्याने घाबरलेला आकाश धावतपळत राजदेवबाबा कॅम्पवर पोहोचला आणि त्याने वनरक्षक व अधिकाऱ्यांना ही घटना सांगितली. रात्री ११ वाजताची वेळ, काळ्याकुट्ट अंधार आणि पाऊस सुरू असतानाही वनकर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री प्रेमचा शोध लागला नाही.

बुधवारी (३ सप्टेंबर) सकाळी पुन्हा एकदा वनकर्मचारी आणि चिखलदरा पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता, एका झुडुपात प्रेम कासदेकर यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्याच्या शरीरावर ओरबाडल्याच्या जखमा होत्या आणि त्याचा एक हातही नव्हता. मृतदेह कंपार्टमेंट ९४४ मधून मुख्य रस्त्यावर आणण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी अचलपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

यावेळी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांचे सुपुत्र यशवंत काळे, आकाश जयस्वाल, दीपक गेंठे, सहायक वनसंरक्षक प्राची उरडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्‍या महिन्‍यात १८ ऑगस्‍ट रोजी जंगलात गुरांना चराईसाठी घेऊन गेलेल्‍या एका युवकावर वाघाने केलेल्‍या हल्‍ल्‍यात त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्‍यातील कुलंगणा खूर्द या गावाजवळील जंगलात घडली होती. प्रवीण सुखराम बेलसरे हा कुलंगणा येथे राहणारा १७ वर्षीय युवक वाघाच्‍या हल्‍ल्‍यात ठार झाला होता. गेल्‍या काही महिन्‍यांमध्‍ये मेळघाटात वाघांच्‍या हल्‍ल्‍यांमध्‍ये प्राणहानीच्‍या घटना वाढल्‍या आहेत. त्‍यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.