नागपूर : इमामवाडा परिसरातील धान्य व्यापाऱ्याने उडद डाळ पुरवण्यासंबंधी सिंगापूर आणि म्यानमारमधील कंपनीशी करार केला. त्याबदल्यात २,००० टन दाळ पूरवठा करण्यासाठी १८ कोटी ३८ लाख २३ हजार रुपयांची रक्कमही अदा केली. परंतु माल पोहोचलाच नसल्याने झालेल्या फसवणूकीचा प्रकार चव्हाट्यावर आला. पीडित व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिंगापूरस्थित चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पारडी येथील व्यापारी अंकित उज्ज्वलकुमार पगारिया (३१) यांच्या पगारिया ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड आणि पगारिया फूडलॅब प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांचे कार्यालय उंटखाना येथे आहे. २०२३ मध्ये पगारिया यांची दलाल शरद जैन यांच्यामार्फत सिंगापूर येथील विवेक दिनोदिया, संगीता दिनोदिया, नरेश दिनोदिया आणि अनिल व्यास या चौघांशी ओळख झाली. हे चौघेही सिंगापूर येथील पीएल ग्लोबल इम्पेक्स प्रा. लि. चे संचालक आहेत. त्यांनी पगारिया यांच्याशी हरभरे, उडद दाळ आणि इतर कडधान्य खरेदी केले. या व्यवहाराच्या बदल्यात आधी योग्य आर्थिक देवाण घेवाणही पूर्ण केली. यामुळे पगारिया यांचा या चौघांवर विश्वास निर्माण झाला.
आधी १८ कोटींचा करार आणि नंतर विश्वासघात
या विश्वासाच्या आधारे पगारिया यांनी २०२४ मध्ये विवेक दिनोदिया, संगीता दिनोदिया, नरेश दिनोदिया आणि अनिल व्यास या चौघांशी उडद दाळ खरेदी करार केला. या बदल्यात पगारिया यांनी १८.३८ कोटी रुपये आरोपीच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. मात्र आरोपी चौघांनीही पगारिया यांना धान्य पुरवले नाही. शिवाय त्यांना पैसे परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पगारिया यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी चौघांवर १८ कोटी ३८ लाखांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
दुचाकी चोरीच्या घटनांचा उलगडा
टेकडीगणेश मंदिर, हुडकेश्वर, मानकापूर, सदर अशा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ९ वाहने चोरणाऱ्या तीन सहाईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्या ताब्यातील चोरीची वाहने जप्त केली. यातील एकट्या शिवम देवमुरत त्रिपाठी (२३) या गोरेवाडीतील वाहनचोराकडे चोरीच्या ५ दुचाकी आणि एक मारुती कारही पोलिसांना सापडली. गोरेवाडातील अभय अजय पाली (३१) यांच्या दुचाकी चोरीचा तपास करताना मानकापूर पोलिसांना शिवमचा सुगावा लागला होता.
टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची प्लेझर दुचाकी पळविणारा सराईत गुन्हेगार शेख रज्जाक उर्फ रिहान वल्द शेख मुश्ताक नंदनवन याला पोलिसांनी चोरलेल्या दोन दुचाकीसह तर तर कुणाल मंगल उके (३, रा. नवीन सुभेदार लेआऊट) या चोराला गुन्हे शाखा पथक एकने अटक केली.