नागपूर : अमेरिकेतील कोलंबस विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करत विद्यापीठाच्या नावाने बनावट ई मेल, कागदपत्रांच्या आधारे चौघांनी संगनमत करत चार विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. यापैकी फसवल्या गेलेली सावनेर येथील तरुणी समृद्धी राजू पराते (२१) हिने सक्करदरा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या चौघांनी समृद्धीला २५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. समृद्धी ही सध्या उझबेकिस्तान येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. तिच्या प्रमाणेच या तिघांनी आणखी तीन विद्यार्थ्यांकडूनही प्रत्येकी २५ लाख रुपये उकळल्याचीही माहिती मिळत आहे.

अतुल रमेशराव इंगोले, व्यंकट रेड्डी (रा. भानू टॉवर इरागुडा, हैदराबाद), उमंग पटेल (रा. अहमदाबाद, गुजरात) आणि शीतल (रा. सक्करदरा) अशी फसवणूक करणाऱ्या चौघांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे परदेशी शिक्षणाच्या नावाखाली चौघांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारी ही टोळी नागपूरातीलच आहे.

अतुल इंगोले याने आधी कोपरगाव येथील आर. जे. कॉलेजचा अमेरिकेतील कोलंबस विद्यापीठाशी सामंजस्य करार असून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो, अशी जाहिरात वर्तमानपत्रात प्रकाशित केली. ही जाहिरात वाचून समृद्धी पराते ही तरुणी सक्करदरा येथील पिपललिंक प्लेसमेंटच्या कार्यालयात पोचली. त्यावेळी अतुलने व्यंकट रेड्डी हा कोलंबस विद्यापीठाचा संचालक आणि उमंग पटेल हा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याची बतावणी केली. यावर समृद्धी परातेचा विश्वास बसल्याने तिघांनी तिच्याकडून नोंदणी, वसतीगृह, खानावळ आणि महाविद्यालय शुल्काच्या नावाखाली २८ लाख ६० हजार रुपये घेतले.

बरेच दिवस झाले तरी प्रवेश पत्र न मिळाल्याने समृद्धीने विचारणा केली असता चौथा आरोपी सहकारी शितल याने पुढच्या तुकडीत प्रवेश मिळेल, असे सांगत समृद्धीचे वडील राजू पराते यांच्या खात्यावर ३ लाख रुपये परत केले. मात्र, तरीही प्रवेश मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समृद्धी परातेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.