रवींद्र जुनारकर

चंद्रपूर : शाळकरी मुलांना जंगल, वन्यप्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, जंगलाप्रती प्रेम निर्माण व्हावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात ७५ हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी घडवून आणणार असल्याची माहिती राज्याचे वन, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याबाबत वन विभाग लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले.

चंद्रपूर प्रेस क्लबच्या पत्रकारांशी चर्चा करताना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगात केवळ १४ देशांमध्ये वाघ शिल्लक असल्याचे सांगितले. त्यात भारतात सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०३ ही सर्वाधिक वाघांची संख्या आहे. येत्या ५० वर्षात बहुतांश देशातील व राज्यातील वाघ हळूहळू कमी होतील. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील विस्तीर्ण जंगल बघता या जिल्ह्यातील वाघ आकर्षण राहील असेही ते म्हणाले. विद्यार्थी दशेपासूनच शाळकरी मुलांमध्ये जंगलाप्रती प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी, वन्यजीवांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत जंगल सफारी घडवून आणणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा >>> यवतमाळ : खिडकीतून मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्रे घेतले!; पेपरफुट प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मुख्य सुत्रधाराचा अजब दावा

ताडोबा, नवेगांव नागझीरा, उमरेड-कऱ्हांडला, मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना ही सफारी घडवून आणणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना एक अभ्यासपूर्ण जंगल, वने व वन्यप्राण्यांवर आधारित पुस्तिका दिली जाणार आहे. सोबतच टी शर्ट, पेन, नोटबुक, चहा, नास्ता व इतर साहित्य पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा आराखडा पूर्णपणे तयार झालेला आहे. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी ही योजना केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या शाळकरी विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र, आता ही सर्व ७५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलाचा विकास करण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.