गडचिरोली : धाडस वयावर अवलंबून नसते, हे दाखवून दिले आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील ७६ वर्षीय गुराख्याने. मृत्यू समोर उभा ठाकला असतानाही न डगमगता वाघाशी झुंज देऊन त्याला पळवून लावणाऱ्या या गुराख्याच्या हिमतीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
बुधवारी सकाळी साधारण साडेनऊ वाजताच्या सुमारास खांदला गावातील रहिवासी शिवराम गोसाई बामनकर हे आपल्या जनावरांना चाऱ्यासाठी चिरेपल्ली बीटमधील जंगलात घेऊन गेले होते. शांत वातावरणात जनावरे चरण्यास सोडलेली असतानाच अचानक एका वाघाने झाडाझुडपातून झेप घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. साधारण माणसाचे धाडसच सुटले असते अशा या परिस्थितीत, शिवराम यांनी मात्र न घाबरता वाघाचा थेट प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला.
वाघाच्या प्रचंड ताकदीपुढे, हातात शस्त्र नसतानाही शिवरामांनी केवळ काठीचा आधार घेत स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी थेट भिडण्याचा मार्ग स्वीकारला. काही मिनिटे हा संघर्ष सुरू राहिला. वाघ त्यांना आपल्या पंज्याने जखमी करत होता, तर शिवराम धैर्याने त्याला दूर सारत राहिले. या झुंजीत अखेरीस वाघ माघारी फिरला आणि जंगलात पसार झाला.
या संघर्षात शिवराम गंभीर जखमी झाले. त्यांच्या अंगावर खोल जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी कसेबसे गाव गाठले आणि कुटुंबीयांना घडलेला प्रसंग सांगितला. तातडीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी राजाराम आरोग्य पथकाकडे नेण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या वयात वाघाशी दोन हात करून त्याला पळवून लावण्याचे धाडस केल्यामुळे शिवराम यांचे परिसरात कौतुक सुरू आहे. त्यांचे धैर्य ऐकून ग्रामस्थ भारावून गेले आहेत. “जंगलातील वीर” म्हणून त्यांचा गौरव केला जात आहे. दुसरीकडे, वाघ मानवी वस्त्यांच्या इतक्या जवळ येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडे मदतीची मागणी
या घटनेनंतर शिवराम यांची मुलगी वनिता बामनकर यांनी वनविभागाकडे निवेदन देत तातडीने आर्थिक मदत आणि उपचारांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनीही एकमुखाने ही मागणी केली असून, धाडस दाखवणाऱ्या या गुराख्याला शासनाकडून योग्य सन्मान मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जंगलात वाघाचा हल्ला हा मृत्यूचे दार ठरतो, पण वयाच्या ७६ व्या वर्षीही शिवराम बामनकर यांनी दाखवलेले धाडस हे मानवी धैर्याचा अपूर्व नमुना ठरला आहे. हा प्रसंग केवळ त्यांच्या जिवावर बेतला नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी कथा ठरला आहे.