गडचिरोली: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येत असलेल्या कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर साधना जराते यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने कारवाई करीत तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश जांभुळे यांना निलंबित केले. यावरून तेथील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत डॉ.जांभुळे हे निर्दोष असून त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही वर्षांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकदा प्रसूती किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान महिलांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. १० डिसेंबरला धानोरा तालुक्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील असाच प्रकार समोर आला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर साधना जाराते या २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर हिवाळी अधिवेशनात याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून त्यांनी तडकाफडकी कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जांभुळे यांना निलंबित करून ५ जणांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही वाचा… शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या नाही तर राजीनामा घ्या! आमदार कुणावार यांचा फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा

याप्रकरणी केलेल्या कारवाईवरून आता आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून यात डॉ. जांभुळे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. डॉ. जांभुळे यांनी शस्त्रक्रिया केली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निवेदनावर २८ कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी लहान अधिकाऱ्यांचा बळी दिला जातोय का, अशी चर्चा आरोग्य विभागात आहे.

प्रतिनियुक्ती वाचविण्यासाठी नागपूरला धाव

महिला मृत्यू प्रकरणानंतर आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यांनतर ‘लोकसत्ता’ने आरोग्यसेवेसोबत आरोग्य विभागात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रतिनियुक्ती आणि बदल्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. दुर्गम भागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्त पदाचे कारण देत मुख्यालयी प्रतिनियुक्ती दिली आहे. यातील एक तर गैरव्यवहारप्रकरणी निलंबित झाल्यानंतर त्याच ठिकाणी कार्यरत आहे. जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना वरिष्ठ अधिकारी यात व्यस्त असल्याने त्यांच्या हेतुवर शंका उपस्थित केली जात होती. कोट्यवधींचे साहित्य आणि औषधी खरेदी यामागचे मुख्य कारण असल्याचीही चर्चा वर्तुळात आहे. त्यामुळे यावर वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli woman death case dr jambhule suspended sacrifice of junior officers to save seniors ssp 89 dvr