||देवेश गोंडाणे

चिटणवीस पार्क येथे झालेल्या हरिजन सभेत अभूतपूर्व गर्दी होती:- अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी ८ नोव्हेंबर १९३३ मध्ये नागपुरातील चिटणवीस पार्क येथे झालेल्या हरिजन सभेत पहिल्यांदा ध्वनियंत्राद्वारे गरजले होते. अस्पृश्यांच्या दु:खविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या बापूंच्या या हरिजन यात्रेला नागपूरकरांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. विशेष म्हणजे, गांधीजींची ही पहिली सभा होती,  ज्यामध्ये पहिल्यांदाच ध्वनियंत्राचा वापर करण्यात आला होता आणि हे सर्व यंत्र तेव्हा मुंबईवरून मागवण्यात आले होते. बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पाउलखुणाचे अस्तित्व आजही उपराजधानीने जपून ठेवले आहे.

नोव्हेंबर १९३३ मध्ये गांधीजींनी दहा महिन्यांच्या हरिजन यात्रेला सेवाग्राम येथून प्रारंभ केला. ही यात्रा ८ नोव्हेंबर १९३३ रोजी नागपूरला आली. महाल परिसरातील चिटणवीस पार्क येथे गांधीजींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेची माहिती वर्तमानपत्रांतून जनतेला मिळाली. गांधीजींची पहिल्यांदाच अशी जाहीर सभा होणार असल्याने नागपुरात अफाट गर्दी झाली होती. सभेत होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन खास मुंबईवरून ध्वनियंत्र मागवण्यात आले होते. तत्कालीन नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. शुभा जोहरी यांनी आपल्या शोधनिबंधात दिलेल्या संदर्भानुसार, गांधीजींच्या सभेला पहिल्यांदाच अशाप्रकारे ध्वनियंत्राचा वापर करण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यत एक आठवडा ही यात्रा राहिली. नागपूर येथून काटोलमार्गे यात्रा मध्यप्रदेशात गेली.

१९२० ला पहिली नागपूर भेट

१९२० मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात घेण्यात आले. त्यासाठी पहिल्यांदा गांधीजी रेल्वे मार्गे नागपुरात आले होते. गांधीजींच्या या आठवणीची साक्ष म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक २ आणि ३ च्या मधात गांधीजींच्या त्या प्रसंगाची आठवण करून देणाऱ्या संदेशाचे फलक लावून ठेवले आहे.