नागपूर: करोनानंतर सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेले असले तरी पहेलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावादरम्यान हे दर घसरले होते. दरम्यान सोन्याचे दर मागील २४ तासात पून्हा घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असल्याचे सराफा व्यवसायिकांचे म्हणने आहे.

जम्मू कश्मिरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीनंतर नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर १३ मे २०२५ रोजी मेकिंग आणि जीएसटी शुल्क वगळून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९४ हजार ६०० रुपयापर्यंत खाली आले होते. परंतु त्यानंतर दरवाढ होऊन २८ मे रोजी सोन्याचे दर पून्हा ९६ हजार रुपयापर्यंत वाढले होते.

दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २८ मे २०२५ रोजी बाजार बंद होतांना सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९६ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ८९ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ७४ हजार ९०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर २९ मे २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९५ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे एकाच दिवसात नागपुरात सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे. त्यानुसार २४ कॅरेटमध्ये सोन्याचे दर ९०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ९०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ७०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ६०० रुपये, घसरल्याचे दिसत आहे. तर प्लॅटिनम धातूचे दर मात्र ४४ हजार प्रति १० ग्राम हे मागील अनेक महिन्यांपासून कायम आहे.

चांदीच्या दरातही घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो २८ मे २०२५ रोजी रात्री बाजार बंद होतांना ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर दुसऱ्या दिवशी २९ मे २०२५ रोजी दुपारी १२.५० रोजी प्रति किलो ९८ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे २८ मे २०२५ रोजीच्या तुलनेत २९ मे २०२५ रोजी चांदीच्या दरात ५०० रुपये प्रति किलो घट झाल्याचे दिसत आहे. दरम्यान हे दर येत्या काळात वाढण्याचे संकेत सराफा व्यवसायिकांकडून दिले जात आहे.