गोंदिया : जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जवळील भिवखिडकी येथे गेल्या आठ दिवसांपासून नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असताना आज बुधवार ९ जुलै रोजी १५ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. बाधित नागरिक ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे तसेच काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे समजते.
सिरेगावबांध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवेगावबांध जलाशयातून भिवखिडकी येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळा सुरू झाल्यावर गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी शुद्धीकरण न करता नळाला थेट जलाशयातून पाणी पोहोचविले जात आहे.
त्यामुळे गावातील दहा ते पंधरा महिला पुरुषांना अतिसाराची लागण झाली. काहींनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे धाव घेतली तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काहींवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू असताना देखील प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही.
त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातून सुट्टी घेऊन रुग्ण बाहेरगावी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. यात दोन शाळकरी मुलींचा देखील समावेश आहे. असे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भिवखिडकी येथील बाधित रुग्णांनी सांगितले. पावसाळा सुरू होऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये पाणी शुद्धीकरण करणारे ब्लिचिंग पावडर टाकले नाही, असे गावकरी सांगतात. त्यामुळे गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
गेल्या आठ-दहा दिवसापासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यामुळे आमच्या प्रकृती बिघडल्या. – विना वासनिक, रहिवासी भिवखिडकी.
गावातील दोन मोहल्ल्यात अतिसाराची साथ आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबत मला सांगितले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून नळाद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हे खरे आहे. विहिरीत दर महिन्याला ब्लिचिंग पावडर टाकले जात आहे. नळपुरवठा योजनेवाले पाणी शुद्ध होऊन येते, असे सांगत आहेत. पाणी उकळून प्यावे, अशी सूचना नागरिकांना देण्यात यावी, असे आपण आरोग्य कर्मचाऱ्याला सांगितले आहे. – धनराज कांबळे, सरपंच, भिवखिडकी