नागपूर : गोसीखुर्द प्रल्पातून लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांना खात्रीशीर पाणी मिळाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पीकांमध्ये बदल करून आधुनिक शेती करावी, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रम्हपुरी येथे शेतकरी बहुउद्देशिय ज्ञान केंद्र (नॉलेज सेंटर व फॅसिलिटी सेंटर) सुरू करण्यात येणार आहे.

विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळामार्फत गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा सहकारी पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या शेतीसाठी बहुउद्देशीय ज्ञान केंद्राची सुरवात होणार आहे. या प्रकल्पामुळे आधुनिक शेतीसोबत बाजारपेठेवर आधारित पीक पद्धती, उत्पादन व उत्पादन वाढ या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शकांकडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. छत्रपती संभाजी नगर येथील वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट (वाल्मी)च्या धर्तीवर ब्रम्हपुरी येथे बहुद्देशिय ज्ञान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी केली.

निवासी प्रशिक्षण केंद्र

नॉलेज सेंटर व फॅसिलिटी सेंटर सुरू करण्याच्या निर्णय विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. या केंद्रासाठी पाच हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. या केंद्राच्या ईमारतीच्या बांधकामासाठी जलसंपदा विभागातर्फे मान्यता मिळाली असून सुमारे ६३९८.६३ लाख अपेक्षित आहे.

या प्रशिक्षण संस्थेमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण तसेच प्रत्याक्षिक, पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस, निवास व भोजन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारची राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण शेतकरी प्रशिक्षण संस्था विकसित करण्याचा विदर्भ पाठबंधारे विभागाचा मानस आहे.

प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात व परिसरात पीक बदल, बाजारावर आधारित पीक पद्धती, उत्पादन, आधुनिक पीक पद्धती, वातवरणीय बदल, अनुषांगिक शेती, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन वाढीला प्रोत्साहन तसेच पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासोबतच बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार उत्पादनाला प्रोत्साहन त्याअनुषांगिक सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष राबविण्याविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच शेतीपुरक व्यवसाय, दुग्ध विकास, पशुपक्षी पालन, विक्री, विपण, हाताळणी, पॅकींग यासोबतच शेतकरी उत्पादक संस्थांच्या सक्षमीकरणसाठी प्रशिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. बहुद्देशिय ज्ञान केंद्र हे राज्य व राष्ट्रीय स्तरावर असावे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी विषयक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणारी संस्था विकसीत करण्यात येणार आहे.