नागपूर : नवे नागपूर वसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शहराला लागून ग्रामीण हद्दीत जमीनीचे दर गगनाला भिडत आहेत. यातून ग्रामीण भागात नवे भू माफिया जन्माला येऊन गन कल्चर वाढीला लागत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.ग्रामीण पोलीस हद्दीत वर्षभरात पोलिसांनी ज्या बंदूका पकडल्या त्याचा आकडा शहरात पकडलेल्या बंदुकांची बरोबरी करणारा आहे. पोलीसांनी जिल्ह्याच्या २१ ग्रामीण हद्दीतून १६ माउजर, ७ देशीकट्ट्यांसह एक भरमार अशा २४ बंदुका पकडल्या. या प्रकरणात ५० जणांच्या मुसक्या आवळल्याचा दावा पोलीस करतात.
जिल्ह्याशेजारचे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा ही राज्ये शहरात येणारी बेकायदेशीर शस्त्रे, गांजाची प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे पकडलेल्या शस्त्रांपेक्षा अधिक संख्यने भू माफियांकडे शस्त्रे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुन्हेगारी कृत्यामुळे फक्त शहरातल्याच रस्त्यांवर रक्ताचे ठसे उमटतात,असेही नाही. शहरा भवताल ग्रामीण भागात शेतीही रक्ताच्या चिखलाने माखत आहे. ग्रामीण भागात चालू वर्षात गुंडांनी३९ जणांचा खून केला. शहरालगतच्या भूखंड स्पर्धेतून ४५ हून अधिक जणांवर प्राणघातक हल्ले झाले. यातले बहुतांश प्राणघातक हल्ले जमिनीच्या वादातून झाल्याची नोंद पोलीस डायरीत आहे.
कुहीच्या खूनाला भू माफीयाचा डाग
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहराला लागून कुहीत देवराव घरजाळे यांचा कुसुंबी जवळ खून झाला. देवरावचा उमरेड मार्गावर भुखंडावर कब्जा होता. त्या बदल्यात त्याने अडिच कोटींची मागणी केली होती. या जागेच्या वादातूनच देवरावचा खून झाला, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले आहेत. या प्रकरणात अंकित येळणे, मुक्तेश्वर मेश्राम, गजानन कडू, गणेश हुड हे चौघे सध्या पोलिसांच्या तावडीत आहेत. शहराला लागून मोक्याच्या भूखंडाचा ताबा हेच या खुनामागे कारण असल्याचे आढळले आहे.
एकाच गुंडाकडे ७ गावठी बंदुका ३६ काडतूस
ग्रामीण पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी खापरखेडातून राजपूत नावाच्या गुंडाला ताब्यात घेतले होते. त्याच्या हस्तकांनी मध्य प्रदेशातील खरगौन आणि बैतूल येथून गावठी बंदुका आणल्याचा सुगावा पोलीसांना लागला होता. पोलिसांनी एकाला अटक करीत ७ गावठी बंदुका पकडल्या. या गुंडाकडे पोलिसांना ३६ जीवंत काडतुसे हाती लागली. ग्रामीण भागातील ही सर्वांत मोठी कारवाई होती. शहरापपेक्षा अधिक ५५ जीवंत काडतूस आणि २रिकाम्या मॅग्झीन ग्रामीण पोलिसांनी पकडल्या आहेत. ग्रामीण भागात गन कल्चर वाढीला लागण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत. या खेरीज पारंपरिक हत्यार बाळगणाऱ्या २५ जणांना अटक झाली, असे पोलीस रेकाॅर्ड म्हणते.
मध्य प्रदेशातील बैतूल, खरगौन, सिवनीतून शस्त्रे ही निश्चितच चिंतेचा विषय आहे. त्याचे नेटवर्क भेदणे ही प्राथमिकता आहे. ७ गावठी पिस्तूल प्रकरणात १० आरोपी सध्या ताब्यात आहेत. राजपूत आणि वर्मा टोळीचे कंबरडे मोडले आहे. भुखंड माफियांचा मुळशी पॅटर्न लागू होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. अनिल म्हस्के, अपर पोलिस अधीक्षक , ग्रामीण
असा आहे शस्त्रसाठा
माउजर: १६
देशी कट्टे: ०७
भरमार: ०१
एअरगन: ०२
चाकू: १२
तलवार: ११
कोयता: ०१
गुप्ती: ०१
एकूण- ५१