अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात संशोधन कार्य करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा विभागप्रमुखाकडून मानसिक छळ करण्‍यात येत असल्‍याच्‍या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विभागप्रमुखाचा कार्यभार काढण्‍याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी विभागप्रमुखांना सात दिवसांत खुलासा सादर करण्‍यास सांगण्‍यात आले असून, त्‍यानंतर चौकशी समिती गठित करण्‍यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठात ‘पीएच.डी’चे संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीचे संबंधित विभागप्रमुखाकडून मानसिक, आर्थिक शोषण होत असल्‍याची तक्रार प्रशासनाकडे करण्‍यात आली. ही तक्रार निनावी असली, तरी तिची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्‍या आदेशानुसार ही कारवाई करण्‍यात आली आहे.

हेही वाचा – गोंदिया : टिप्परची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघे ठार

विद्यार्थिनीच्‍या तक्रारीनुसार, १ सप्‍टेंबर २०२० रोजी पीएच.डी. साठी तिने नोंदणी केली होती. संबंधित विभागाच्‍या प्रयोगशाळेतच तिचे संशोधन कार्य सुरू होते. गेल्‍या वर्षी १ एप्रिलपासून संबंधित विभागप्रमुखाने तिला मानसिक त्रास देण्‍यास सुरुवात केली. शैक्षणिक कारण नसतानाही बाहेर ठिकाणी फिरायला येण्‍यासाठी त्‍यांनी अनेकदा विद्यार्थिनीवर दबाव टाकला. त्‍याला विरोध केल्‍यानंतर तिला प्रयोगशाळेत उपयोगात येणाऱ्या वस्‍तू विकत आणण्‍याच्‍या निमित्ताने त्रास देण्‍यात आला. बऱ्याच वस्‍तू स्‍वखर्चाने आणूनही विभागप्रमुखाने प्रत्‍यक्ष-अप्रत्‍य पैशांची मागणी केली. २२ ऑक्‍टोबर २०२२ रोजी संबंधित विभागप्रमुखाच्‍या विरोधात कुणी अज्ञात व्‍यक्‍तीने निनावी तक्रार केली. त्‍या तक्रारीशी संबंध नसतानाही या विद्यार्थिनीवर संशय घेऊन विभागप्रमुखाने तिचा मानसिक छळ वाढवला. तडजोड केली नाही, तर तुझ्या अहवालावर नकारात्‍मक शेरा लिहिला जाईल, अशी धमकी या विद्यार्थिनीला देण्‍यात आली. पैसे दिले नाही, तर पदवी पूर्ण होऊ देणार नाही. प्रयोगशाळेत काम करू देणार नाही, तुझ्या कुटुंबीयांवरही आमची पाळत आहे, अशा प्रकारे विभागप्रमुखाने वेळोवेळी धमकावल्‍याचे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा – गोंदिया : टिप्परची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघे ठार

या विद्यार्थिनीला चार महिन्‍यांपासून प्रयोगशाळेत संशोधन कार्य करण्‍यास बंदी घालण्‍यात आली. शैक्षणिक भवितव्‍य धोक्‍यात आल्‍याने तिने वरिष्‍ठांकडे धाव घेतली. या प्रकरणाची चौकशी करून आपल्‍याला न्‍याय मिळवून द्यावा, अशी मागणी या विद्यार्थिनीने कुलगुरूंसह राज्‍याचे उच्‍च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, अमरावती विभागाच्‍या सहसंचालकांकडे केली आहे. तक्रारीच्‍या अनुषंगाने विभागप्रमुखाचा कार्यभार काढण्‍यात आला असल्‍याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्‍यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harassment of ph d student to go out for a walk amravati university removed the responsibility of the hod mma 73 ssb