यवतमाळ : परिचारिकांना केंद्रानुसार भत्ता देण्यासोबतच अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य परिचारिका संघटनेने आंदोलन छेडले आहे. दोन दिवसाचे धरणे आणि त्यानंतर एक दिवशीय लक्षवेधी आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे नाईलाजाने संघटनेला बेमुदत संप पुकारावे लागले अशी माहिती राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष संगीता राठोड यांनी दिली.

परिचारिकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहे. यावर ठोस पाऊले उचलली जावी यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.पाठ्यनिर्देशिका या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे, राज्यातील परिचारिकांना केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ता सात हजार २०० रुपये मंजूर करावा, पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे, केंद्राप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करावा, वैद्यकीय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या कंत्राटीभरती परिपत्रकातून परिचारिकांना वगळण्यात यावे, परिचर्या संवर्गातील शुश्रूषा, शैक्षणिक व अशैक्षणिक विविध पदाच्या कायमस्वरूपी शंभर टक्के पदभरती, पदनिर्मिती करण्यात याव्यात, वाढलेल्या अतिरिक्त खाटा नवीन महाविद्यालये व वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार नवीन आकृतिबंध मंजूर करावा, अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी, जीएनएम विद्यार्थी परिचारिकांचे विद्यावेतनात वाढ केली जावी, वाढती महागाई विचारात घेता बीएस्सी नर्सिंग विद्यार्थ्यांप्रमाणे जीएनमच्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देण्यात यावे, परिचारिकांच्या आस्थापनेतील दफ्तर दिरंगाई दूर केली जावी, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिचारिका रस्त्यावर उतरल्या आहेत.

आंदोलनात आरती मडावी, विश्वास चांदेकर, सिद्धार्थ मेश्राम, वैशाली दातार, सुरेखा मदनकर यांच्यासह शेकडो परिचारिका सहभागी झाल्या आहेत. यापूर्वी १५ राज्य कार्यकारिणीच्या उपस्थितीत आझाद मैदानात १५ आणि १६ जुलै रोजी धरणे आंदोलनातून इशारा देण्यात आला. त्यानंतर १७ जुलैला एक दिवसीय लक्षवेधी संप पुकारण्यात आला, परंतु, मागण्यांचा विचार न झाल्याने आंदोलकांनी लगेचच १८ तारखेपासून बेमुदत संप सुरु केला आहे. मागील पाच दिवसांपासून येथील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यापूर्वीही २०२२ रोजी संघटनेने सात दिवसीय कामबंद आंदोलन केले होते. परंतु, काही दिवसांनी सरकार बदलल्यानंतर त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे परिचारिकांनी पुन्हा एकदा तीव्र लढ्याला सुरुवात केली आहे.

रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे दु:ख आम्हास आहे. आम्ही आंदोलन सुरु करण्यापूर्वी जिल्हा व रुग्णालय प्रशासनाला निवेदने दिली. त्यानंतर दोन दिवसीय धरणे आणि एक दिवसीय लक्षवेधी संप झाला. तरीदेखील आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखविल्या गेली. त्यामुळे यावेळी राज्य कार्यकारिणीच्या आदेशानंतर आणि मागण्यांच्या पूर्ततेशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

आंदोलकांना लघुशंकेसाठी मज्जाव

जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आंदोलक परिचारिकांना लघुशंकेस जाण्यासाठी मज्जाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या आतील प्रसाधनगृहात बंदी घातल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात लवकरच तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्ष राठोड यांनी बोलताना दिली.