शहरात महापालिकेकडून आजपासून अंमलबजावणी
उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणारे मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी उद्या, १ एप्रिलपासून नागपूर महापालिका ‘उष्माघात कृती आराखडा’ शहरात लागू करणार आहे. गेल्यावर्षी ‘उष्माघात कृती आराखडा’च्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हवामान खात्याने यावर्षी तापमान अधिक राहील, असे संकेत दिले आहेत. शहरात बांधले जात असलेल्या सिमेंट रस्त्यांमुळे तापमान वाढीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे यावर्षी आराखडय़ाच्या अंमलबजावणीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गुजरातच्या धर्तीवर यावर्षी ‘उष्माघात कृती आराखडा’ तयार करण्यात आला आहे. गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर त्याची सुरुवात झाली. संपूर्ण राज्यभरात हा आराखडा लागू केला जाणार आहे. नागपुरातही हा आराखडा लागू करण्याच्या दृष्टीने आराखडय़ाचे समन्वयक डॉ. नंदकिशोर राठी, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, साथरोग अधिकारी डॉ. सुनील घुरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांची बैठक पार पडली. काही वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादेत उष्णतेच्या लाटेमुळे ३०० लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर त्याठिकाणी ‘उष्माघात कृती आराखडा’ राबवण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणजे उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात बरीच घट झाली होती. त्याच धर्तीवर आता नागपुरातही उद्या, शनिवारपासून हा आराखडा राबवला जात आहे. मात्र, प्रायोगिक तत्त्वावर गेल्यावर्षी आराखडा अंमलबजावणीत अपयश आले होते. वाहतूक दिवे असलेल्या चौकात टाकलेल्या शेडचा दुसऱ्याच दिवशी बोजवारा उडाला होता. त्यामुळे यावर्षी आराखडय़ाच्या अंमलबजावणीकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
दोन वर्षांंपूर्वी देशात उष्णतेच्या लाटेत सुमारे अडीच हजार लोकांचा बळी गेला होता. त्याची गंभीर दखल घेत न्यूयॉर्कस्थित नॅशनल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल या संस्थेने ‘उष्माघात कृती आराखडा’ तयार केला. मात्र, प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे ज्या शहरांमध्ये हा आराखडा राबवला जाणार, त्या शहरांच्या संरचनेचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. एकच आराखडा प्रत्येक शहराला लागू होईल, असे नाही.
‘उष्माघात कृती आराखडा’
- महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासअंतर्गत उद्याने नागरिकांसाठी खुली करून देण्यात आली आहेत. त्याठिकाणी वातावरण थंड राहील, अशी व्यवस्था असणार आहे.
- शहरातल्या वेगवेगळ्या भागात ‘थंड क्षेत्र’ तयार करण्यात येईल. याअंतर्गत शहर बसस्थानक, वाहतूक दिवे असलेले चौक आदी ठिकाणी शेड टाकले जाणार आहेत.
- सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरातल्या विविध भागांमध्ये पाणपोईची व्यवस्था करण्यात येईल. याठिकाणी नागरिकांना थंड पाणी मिळेल, अशी व्यवस्था असेल.
- शहरात ठिकठिकाणी रस्ते, इमारतींची बांधकामे सुरू आहेत. प्रामुख्याने दुपारी १२ ते ३ या कालावधीत हे निर्माण कार्य बंद ठेवण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या वेळी घेण्याचे निर्देश महापालिकेने शिक्षण संस्थांना दिले आहेत.
- तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास नागरिकांना एसएमएस व इतर माध्यमातून कळवले जाणार आहे.