अमरावती : सध्या हिंदुत्वाचे प्रमाणपत्र नागपूरमधून मिळत आहे, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली. आपल्याला हिंदू असल्याचे सिद्ध करावे लागते आणि त्याच वेळी सरकारशी संघर्षही करावा लागत आहे. एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत आहोत आणि प्रसारमाध्यमेही सोबत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने अमरावती येथे आयोजित कापूस अभ्यासक आणि कृषी तज्ञांच्या संवाद कार्यक्रमादरम्यान टिकेत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारचा विरोध म्हणजे धर्माचा विरोध अशी चुकीची धारणा तयार केली जात आहे. परंतु, आपल्याला न्यायव्यवस्था आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे, असे राकेश टिकेत म्हणाले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी लढले पाहिजे. त्यांनी शेतात काम करण्यासाठी वापरलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग आंदोलनासाठीही केला पाहिजे, असे आवाहन राकेश टिकेत यांनी केले.

महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतमालाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे त्रस्त आहेत आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्यात मोठ्या शेतकरी आंदोलनाची गरज आहे. विदर्भातील शेतकरी लढवय्ये आहेत, त्यामुळे त्यांनी आत्महत्या न करता लढायला शिकले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

आत्महत्यांना रोखण्यासाठी लढा महत्त्वाचा

दरवर्षी देशात लाखो शेतकरी आत्महत्या करतात. परंतु, शेतीची मालकी स्वतःच्या नावावर नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेती संयुक्त कुटुंबाच्या नावावर असणे गरजेचे आहे, असे टिकेत म्हणाले. महाराष्ट्रात कुठेही शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव होत असल्यास आम्ही धावून जाऊ आणि तो होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सरकार भांडवलदारांच्या बाजूने

सध्याचे सरकार हे भांडवलदारांचे हित जपणारे असून, त्यांच्याच हिताचे निर्णय घेतले जात आहेत. बहुतांश प्रसारमाध्यमेही सरकारची बाजू मांडत असल्याने सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, अशी खंत टिकेत यांनी व्यक्त केली.

मतांसाठी योजना

महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने ‘लाडकी बहीण’ सारख्या आकर्षक योजना मतांसाठी आणल्या होत्या, मात्र आता अनेक भगिनींना त्यातून वगळल्याची माहिती समोर येत आहे. मतांसाठी अशा योजना आणणे योग्य नाही, असेही टिकेत म्हणाले.

आम्ही निष्पक्ष आहोत

२०१४ पूर्वीही शेतकरी आत्महत्या करत होते आणि शेतीचे प्रश्न होते. आम्ही तेव्हापासूनच सरकारविरोधात लढत आहोत. सध्याच्या सरकारविरुद्ध लढल्याने आम्हाला चुकीचे ठरवले जात आहे. पण आम्ही निष्पक्ष असून, फक्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करत आहोत, असे राकेश टिकेत यांनी सांगितले.