अकोला : सणासुदीत बाजारपेठेमध्ये सुगीचे दिवस असतात. या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. शुभमुहूर्तावर नव्या घराचे स्वप्न साकार करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सदनिकांच्या विक्रीचा चढता आलेख असून सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती ‘एसीसीई’चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पंकज कोठारी यांनी दिली.
सण हा नवीन सुरुवात आणि समृद्धीचा काळ मानला जातो. त्यामुळे अनेक लोक या काळात घर खरेदी करतात. विशेषतः दिवाळीसारखे सण समृद्ध मानले जातात. मालमत्ता व्यवहार पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम वेळ असतो. सणासुदीच्या काळात दरवर्षी सदनिकांची विक्री चांगली होते. या काळात अनेक लोक नवीन घर घेतात आणि बांधकाम व्यावसायिक आकर्षक सवलती देतात. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. स्पर्धेमुळे विक्रेत्यांना कमी किंमतीत सवलती द्याव्या लागतात. गणेश चतुर्थी ते दिवाळीपर्यंतचा काळ सदनिका खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
अकोला शहरातील मालमत्ता बाजारपेठ प्रसिद्ध असून अनेक ठिकाणी नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. शहरातील जठारपेठ, रामदासपेठ, राम नगर, गोरक्षण रोड, शास्त्री नगर आदी भागांमध्ये प्रकल्पांची कामे सुरू आहेत. शहराचे हे मध्यवर्ती भाग असल्याने या ठिकाणी सदनिकांचा दर देखील अधिक आहे. अकोला शहरात २ बीएचके सदनिकेची किंमत चांगल्या परिसरामध्ये आता ८० लाख ते सव्वा करोड रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शहरापासून दूर मलकापूर, खडकी, जुने शहर, न्यू तापडिया नगर आदी भागांमध्ये तुलनेत किंमती कमी आहेत. सर्वसुविधा युक्त सदनिका घेण्यातच खरेदीदारांचा रस दिसून येतो. गणेशोत्सवापासून शहरातील मालमत्ता बाजारपेठेला उभारी मिळाली. त्यानंतर नवरात्रोत्सव, दसऱ्यामध्ये मोठ्या संख्येने सदनिकांची नोंदणी व गृहप्रवेश झाले. आता दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक खरेदीदार उत्सुक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
इतर शहरांच्या तुलनेत किंमती जास्तच; तरीही विक्रीत वाढ
अकोला शहरात वैद्यकीय क्षेत्र व शिकवणी वर्गाचे जाळे पसरले. गुंतवणूकदारांची संख्या देखील मोठी आहे. त्यातच शहरातील मर्यादित जागा लक्षात घेता मालमत्तांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. इतर शहरांच्या तुलनेत अकोल्यात सदनिका व इतर मालमत्तांच्या किंमती खूप जास्त आहेत. तरीही विक्रीत वाढच होत आहे.
बाजारपेठेला उभारी
सणासुदीच्या काळात सदनिका खरेदी करण्याला ग्राहकांची पसंती असते. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना विविध सोयीसुविधा दिली जाते. शहरातील सदनिकांच्या विक्रीमध्ये सुमारे १० टक्के वाढ झाली. शहरातील मालमत्ता बाजारपेठेला उभारी मिळाली आहे, असे एसीसीईचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पंकज कोठारी यांनी सांगितले.