नागपूर : भारतात दर चार वर्षांनी होणारी व्याघ्रगणना आता २०२६ मध्ये होणार आहे. २०२२ मध्ये झालेल्या गणनेत भारतात ३,६८२ वाघांची संख्या नोंदवली गेली. त्यामुळे २०२६च्या गणनेनंतर वाघांची संख्या किती असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मध्यभारतातून या गणनेची तयारी सुरू झाली असून २०२७ मध्ये ही आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने अखिल भारतीय व्याघ्र अंदाज २०२६ची तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पातून याची सुरुवात झाली. १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजित कार्यशाळेत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंड या पाच राज्यांमधील सुमारे १५० अधिकारी सहभागी होते.
भोपाळचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एल. कृष्णमूर्ती, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे उपमहानिरीक्षक डॉ. वैभव माथूर, पेंच व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक देवप्रसाद जे. आणि पाच राज्यातील क्षेत्र संचालक, विभागीय वनाधिकारी, उपसंचालक, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्रीय जीवशास्त्रज्ञ, पहिल्या फळीतील कर्मचारी तसेच भारतीय वन्यजीव संस्थेचे व्याघ्र कक्षाचे डॉ. बिलाल हबीब यांचा कार्यशाळेत समावेश होता. व्याघ्रगणनेची शास्त्रोक्त पद्धत, एमस्ट्राइप्स या ॲपआधारित सॉफ्टवेअरचा गणनेसाठी वापर, कॅमेरा ट्रॅपिंग, सर्वेक्षण व प्रत्यक्ष गणनेदरम्यान करावयाची कामे या विषयांवर या निवडक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ‘ऑनलाईन ॲप’मध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातच आता या प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे.
वाघांची उच्च घनता असणाऱ्या क्षेत्रात सर्वात शेवटी गणना केली जाणार आहे. व्याघ्रप्रकल्पासह, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये, महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अखत्यारितील वनक्षेत्र आणि प्रादेशिक वन विभागाच्या अखत्यारितील वनक्षेत्र अशा सगळ्या ठिकाणी व्याघ्र गणनेची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दशकभराहून अधिक काळापासून व्याघ्रगणनेची पारंपरिक पद्धत बाद करुन नवीन अत्याधुनिक पद्धतीने ही गणना केली जात आहे. गेल्या दोन गणनेपासून बिबट्यांची देखील गणना केली जात असून ती आकडेवारी जाहीर केली जात आहे. त्यामुळे २०२६च्या गणनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात टप्प्यानुसार गणना
मध्य प्रदेशात ज्याप्रमाणे टप्प्यानुसार गणना केली जाते, तीच पद्धत यावेळी महाराष्ट्रात देखील वापरली जाणार आहे. टप्प्यानुसार गणना केल्यास गणनेचे साहित्य पुरेसे राहील. तसेच सोबत प्रशिक्षकसुद्धा राहतील. त्यामुळे गणनेच्या वेळी होणारा गोंधळ टाळल्या जाईल. मध्य प्रदेशात सर्वाधिक ‘लाईन ट्रॅन्झॅट’ आणि ‘कॅमेरा ट्रॅप’ वापरले जातात. यावेळी महाराष्ट्रात देखील ते वापरले जातील.