नागपूर : परीक्षेची भीती, अभ्यासाचा तणाव, घरातील ताणतणावाचे वातावरण, आई-वडिलांचे रागावणे, मोबाईलचे व्यसन, मैत्री आणि प्रेमसंबंध या मुख्य कारणावरुन गेल्या चार वर्षांत नागपुरात १११ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अर्ध्याअधिक मुला-मुलींनी गळफास घेऊन, विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक माहिती नागपूर पोलीस विभागातील नोंदीवरुन समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याच्या काळात विभक्त कुटुंबियांची संख्या वाढली आहे. बक्कळ पैसा कमावणारे वडिल किंवा नोकरदार असलेल्या आई अशा पालकांकडे मुलांना द्यायला पैसा आहे मात्र वेळ नाही. त्यामुळे कमावते आईवडिलांचे मुलांकडे नेहमी दुर्लक्ष होत असते. अशातून मुलांच्या स्वभावात आणि वागणुकीत बदल होत असल्याचे जाणवत आहेत. मुलांना राग अनावर होणे, मोठ्यांना उलटून उत्तर देणे किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणे इत्यादी विचार अल्पवयीनांच्या मनात सुरु असतात. अनेकदा आईवडिलांचा अभ्यासाला बसण्याचा तगादा किंवा घरात आईवडिलांचे सतत होणारे वाद-भांडणे याचाही परिणाम मुला-मुलींवर होत आहे. अशा स्थितीमुळे मुलांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होते.

जीवनात आलेले अपयश, अपेक्षा भंग, मनातील भीती, आई-वडिलांचा दबाव, मैत्री तुटणे, प्रेमभंग होणे, नैराश्य, अभ्यासाची भीती, मोबाईल वापरण्यास बंदी, प्रेमसंबंधाची कुटुंबियांना माहिती होणे, बदनामीची भीती वाटणे अशा कारणातून गेल्या २०२० चे २०२४ या चार वर्षात १११ अल्पवयीन मुलामुलींनी आत्महत्या केली. त्यामध्ये ५९ मुलींचा समावेश आहे. गेल्या २०२४ मध्ये २३ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्या केली. अल्पवयीनांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून अल्पवयींनाच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुला-मुलींचा आकडा बघता पालक, कुटुंबसंस्था, शाळा व्यवस्थापन आणि पोलीस विभागाला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

आत्महत्यांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक

मुली मुलांपेक्षा जास्त भावनिक असतात. त्यामुळे मुली नैराश्यात जातात. गेल्या चार वर्षात १११ अल्पवयीन मुलामुलींनी आत्महत्या केली. त्यामध्ये ५९ मुलींचा समावेश आहे. गेल्या २०२४ मध्ये २३ अल्पवयीन मुला-मुलींनी आत्महत्या केली. त्यामध्ये १३ मुलींचा समावेश आहे. १५ ते १७ या वयोगटातील सर्वाधिक मुलींनी प्रेमात दगा मिळाल्यानंतर आत्महत्या केली असून मुलींनी व्यसन आणि रागाच्या भरात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुलांपेक्षा जास्त मुलींनी आत्महत्या केल्याची नोंद नागपूर पोलिसांनी केली आहे.

आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र-तामिळनाडू अव्वल

अल्पवयीन मुले आणि विद्यार्थ्यांच्या भारतामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. या राज्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या संख्येच्या एक तृतीयांश आत्महत्या या तीन राज्यांमध्ये होतात, असा दावा विद्यार्थ्यांना आणि शाळांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या ‘आयसी थ्री इंस्टीट्यूट’ने केला आहे.

पालक आणि पाल्यातील संवाद हरवला आहे. कुटुंबातील भाव-भावना समजून घेण्याची क्रिया बधीर झाली आहे. आईचे प्रेम आणि वडिलांनी केलेले कौतूक संपले आहे. गरजेपेक्षा जास्त पैसे देणे म्हणजे मुलांवरील प्रेम असा समज पालकांचा झाला आहे. नात्यातील ओलावा संपल्यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढला आहे. अशा स्थितीमध्ये मुलांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. -राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs adk 83 mrj