अठरा हजारांवर अर्ज;  नवीन नियमावली जाहीर

नागपूर : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. आरटीई संकेतस्थळावर नागपुरातून मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील ६६३ शाळांमधून ६१८६ जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी आतापर्यंत १८ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. दरम्यान, अर्ज भरताना काही सूचना पालकांसाठी जारी करण्यात आल्या आहेत. नव्या सूचनेनुसार एकाच विद्यार्थ्यांचा दोन वेळा अर्ज केल्यास दोन्ही अर्ज बाद होणार आहे. यामुळे एकच अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरटीई अंतर्गत खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व मागास घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील ६६३ शाळांमध्ये ६१८६ जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरटीई प्रवेशाला उदंड प्रतिसाद मिळत असून अठरा हजारांहून अधिक पालकांनी अर्ज दाखल केले. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत १९ शाळांनी यावर्षी नोंदणी केली नाही. मात्र दुसरीकडे आरटीईच्या नव्या निकषांमुळे ४५७ जागा वाढल्या आहेत. याचा फायदा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांना होणार आहे.

अशा आहेत सूचना..

*   पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन द्यावे लागेल.

*   अपत्याचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच तारीख लिहावी.

*   तीन किमीपेक्षा अधिक अंतराच्या शाळा मिळाल्यास येण्या-जाण्याचा खर्च पालकांना करावा लागेल.

*   लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होईल.

*   अर्ज भरून झाल्यावर आणि जमा केल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज पूर्ण डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.