अमरावती : शहरात २०२३-२४ या वर्षात आतापर्यंत एकूण १५ हजार ५७९ श्‍वानदंशाच्‍या प्रकरणांची नोंद झाली असून भटक्‍या कुत्र्यांच्‍या प्रजनन दराच्‍या तुलनेत दरवर्षी निर्बीजीकरण शस्‍त्रक्रिया केल्‍या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्‍या कमी असल्‍याने अमरावती शहरातील भटक्‍या कुत्र्यांच्‍या वाढत्‍या संख्‍येवर नियंत्रण मिळविण्‍यात महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही. शहरात भटक्‍या कुत्र्यांची नेमकी संख्‍या किती याची संख्‍या महापालिकेकडे नाही. शहरात सुमारे ३० हजारांवर मोकाट कुत्रे असल्‍याचा अंदाज आहे. गल्‍लीबोळातच नव्‍हे, तर मुख्‍य रस्‍त्‍यांवर कुत्र्यांची संख्‍या वाढल्‍याने नागरिकांना रात्रीच्‍या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शहरातील अनेक भागांत अधूनमधून कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रकार घडत असतात. मोकाट कुत्र्यांकडून घातला जाणारा धुमाकूळ ही चिंतेची बाब झाली असताना पालिकेची यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण घालण्यात अपयशी ठरली आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी मोठी असूनही त्यांना पकडण्याची व्यवस्था अतिशय तोकडी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची महापालिकेची उपाययोजना तोकडी पडत असल्याने वेळोवेळी कुत्र्यांचा बंदोबस्त करा वा पूर्वीप्रमाणे भटक्या कुत्र्यांना मारण्यात यावे ही मागणी अनेकदा केली गेली. १९९३ पर्यंत भटक्या कुत्र्यांना मारले जात होते. मात्र, प्राणीमित्र संघटनांनी त्याविरोधात केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या मारण्यावर बंदी घातली आहे. याच्या परिणामी राज्यात व अमरावती शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वेगाने वाढत आहे.

हेही वाचा : औषध चाचण्यांचा निष्कर्ष, देशभरात आठ हजारांहून अधिक नमुने निकृष्ट

महापालिका प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार नागरी वस्त्यांमध्ये नागरीक व लहान मुले यांच्यावर श्वानांच्या प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत, यावर नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी शासन निर्णय, सर्वोच्च न्यायालय तसेच नगर विकास विभागाच्‍या पायाभूत सुविधांबाबत दिलेल्‍या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रामध्ये भटके श्वान तथा रेबीज ग्रस्त, जखमी, अपंग बेवारस अशा प्रकारच्या श्वानांसाठी श्वानगृह, श्वाननिवारा केंद्र, उपचार केंद्र तयार करण्‍याच्‍या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. यासाठी गेल्‍या ६ मार्च रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्‍या माध्‍यमातून अमरावती महापालिका क्षेत्रामधील २० ते २५ हजार श्वानांचे शस्त्रक्रिया, लसीकरण, उपचार आणि निवारा याबाबतीत उपाययोजना करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati stray dog bite 15 thousand people in a year mma 73 css