अमरावती : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अमरावती शहरात राबवण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून केवळ ६५ टक्के जागांवरच प्रवेश झाला होता. यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण १६ हजार जागा उपलब्‍ध आहेत. पण, यंदा देखील जागा रिक्‍त राहण्‍याची शक्‍यता आहे. त्यामुळे दरवर्षी अकरावी प्रवेशाच्या वाढत्या जागांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशात व्यवस्थापन, अल्पसंख्याक, इनहाऊस अशा विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शून्य ते शेवटच्या फेरीपर्यंत संधी दिली जाते. मात्र कोट्यांतर्गत प्रवेशात निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत असल्याचे दिसून आले. अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्‍ये प्रवेश घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : अमरावतीच्‍या पक्षीसूचीत सहा नव्‍या पाहुण्‍यांची नोंद

शहरात ९ हजार ६०० विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे. त्यापैकी आजवर ६ हजार ९०० विद्याथ्यर्थ्यांनी कॉलेज ऑप्शन फॉर्म (भाग २) भरला आहे. २६ जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शहरातील ६८ कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेशासाठी एकूण १६ हजार जागा उपलब्‍ध आहेत.

अमरावतीत अकरावी प्रवेशासाठी २४ मेपासून नोंदणी सुरू झाली. ५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पसंती दर्शवणारा अर्ज क्रमांक २ भरण्यास सुरुवात झाली. १८ जूनला इनहाऊस, अल्पसंख्याक कोटा यादी, १८ ते २१ जून दरम्यान शून्य प्रवेश फेरी प्रवेश, २६ जूनला प्रथम प्रवेश फेरी गुणवत्ता यादी आणि २६ ते २९ जूनपर्यंत प्रथम फेरी प्रवेश, असे वेळापत्रक आहे. गतवर्षी मनपा हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात १६१९० जागा उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतरही ५६३९ जागा (३५ टक्के) रिक्त राहिल्या होत्या.

हेही वाचा : आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, प्रवेशासाठी पुन्हा वाट…

व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांकडे कल

सध्‍या विद्यार्थ्‍यांचा कल व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांकडे अधिक असल्‍याचे दिसून आले आहे. दहावीनंतर विविध विषयांचे अल्‍पकालीन अभ्‍यासक्रम उपलब्‍ध आहेत. याशिवाय तंत्रनिकेतन पदविका अभ्‍यासक्रमाला देखील विद्यार्थी प्राधान्‍य देतात. तंत्रनिकेतन पदविका प्राप्‍त विद्यार्थ्‍यांना अभियांत्रिकी पदवी अभ्‍यासक्रमात थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. याशिवाय विद्यार्थ्‍यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांमध्‍येही विविध अभ्‍यासक्रम आहेत.

शहरात शाखानिहाय उपलब्‍ध जागा

कला शाखा – ३५९०
वाणिज्‍य शाखा – २८९०
विज्ञान शाखा – ७३००
एचएससी व्‍होकेशनल- २६२०
एकूण जागा – १६४००

हेही वाचा : पुणे अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती…..अल्पवयीन कारचालकाने सहा जणांना चिरडले….

अमरावती महापालिका क्षेत्रातील इयत्‍ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होत असून प्रवेशाच्‍या पहिल्‍या फेरीमध्‍ये ९ हजार ६०० विद्यार्थ्‍यांनी प्रवेशासाठी पसंती नोंदवली आहे. गुणवत्‍ता यादी २६ जून रोजी गुणवत्‍ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

प्रा. अरविंद मंगळे, प्रवेश प्रक्रिया समन्‍वयक.