बुलढाणा: आपल्या वादग्रस्त भाषणातून जाहीर धमकी देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या आणि त्यांच्या सभा बंदीच्या मागणीसाठी शुक्रवारी बुलढाण्यात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले! वरून धो धो कोसळणाऱ्या पावसात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आपला आक्रोश व्यक्त केला. नितेश राणे यांच्या प्रक्षोभक विधानानंतर संपूर्ण राज्यात निघालेला हा पहिला विराट मोर्चा असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. भाजपचे वादग्रस्त आमदार नितेश राणे यांना वक्तव्याबद्धल तात्काळ अटक करावी आणि राज्यात त्यांच्या जाहीर सभावर बंदी घालावी या मागणीसाठी शुक्रवारी, ६ सप्टेंबरला मोर्चा काढण्यात आला .
बुलढाणा अजिंठा मार्गावरील इंदिरा नगर परिसरातून काढण्यात आलेला हा मोर्चा मुस्लिम बांधवांचे शक्तिप्रदर्शन ठरला! इंदिरा नगर मधून मोर्चा सुरू झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र या धो धो कोसळणाऱ्या या पावसाची तमा न बाळगता हजारो बांधव मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. संविधान जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, नितेश राणे यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. बुलढाणा बस स्थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे निघालेला हा मोर्चा पावसातच जिल्हाधिकारी कार्यलयावर येऊन धडकला!
हेही वाचा : नागपूर: ओबीसी वसतिगृह सुरू करण्यासाठी आणखी एक तारीख, मंत्र्यांविरुद्ध नाराजी
वक्त्यांनी केला नितेश राणेंचा निषेध
यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मन्सूर सहाब इमाम, सतीशचंद्र रोठे पाटील, हाफिज मुजाहिद साहब, मौलाना मुजीब, यांनी संबोधित केले. त्यांनी नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली. देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरीत अटक करावी. हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारावी, पोलिसांचे मानसिक खच्चीकरण रोखावे, सामाजिक तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचे षडयंत्र ,मज्जिदीमध्ये घुसून मारण्याची धमकी देन्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा जिल्हा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा : सिलेंडरचा स्फोट, कंपनीतील वायू गळती रोखणारे नेमके संशोधन काय?
काय आहे निवेदनात?
मोर्चा नंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन देताना रहमत खा, मुफ्ती जमीर साहब, मौलाना समीर साहब, समीर खान, मुफ्ती जमीर सिराजी, काँग्रेसचे जयश्री शेळके, हर्षवर्धन सपकाळ, मोहम्मद सज्जाद, शेख समीर, जनसेवक मोहम्मद सोफियान, डॉ. मोबीन, बबलू कुरेशी,जाकीर कुरेशी, जुनेद डोंगरे, दानिश अजहर, असलम शाह, नदीम शेख,साबिर अली,बिलाल डोंगरे, हरीश रावळ, रिजवान सौदागर,आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रात नितेश राणे सामाजिक तेढ निर्माण करीत आहे. येणा-या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंदू मुस्लिम वाद निर्माण झाला पाहिजे, हिंदू मुस्लिम दंगल घडली पाहिजे हा कुटील हेतू ठेवून नितेश राणे यांनी कट कारस्थान रचले आहे. मुस्लिमांना मज्जीदीत जाऊन चुन चुन के मारेंगे, पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत सारख्या वक्तव्यांमुळे सामाजिक दरी निर्माण होणार आहे. भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे, असे निवेदनात नमूद आहे.
इकबाल चौकात जोडे आणि दहन
मोर्चा पूर्वी जनता चौक नजीकच्या इकबाल चौक येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात येऊन प्रतिमेचे दहन करण्यात आले.