पिंपरी : बेशिस्त वाहतूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची कमतरता आणि वाढता परिसर लक्षात घेता नाशिक फाटा ते राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, चाकण, शिक्रापूर या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीमुळे कामगार, कच्चा माल कंपन्यांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब झाल्याने उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे उद्योग बाहेर जाण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी परिवहन, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये बैठक पार पडली. माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे : नऱ्हे भागात सदनिकेत वडील, मुलगा मृतावस्थेत सापडले

माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर म्हणाले, अपघात होण्यामागे बहुतेक वेळा माणसाचा स्वतःवरील ताबा नसणे, बेशिस्त वाहतूक अशा गोष्टी कारणीभूत आहेत. अपघातांमध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर त्या व्यक्तीचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. कामगारांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण जबाबदारीने व वाहतुकीचे सर्व नियम पाळून कामावर जावे. काही मिनिटे उशीर होईल. पण, सुरक्षित कामावर जाणे, घरी पोहोचण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावे.

सहायक पोलीस आयुक्त कसबे म्हणाले की, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पोलीस कमी असल्याने कोंडी कमी करण्यावर ताण येतो. अडचणी येतात, त्याकरिता कंपन्यांनी वॉर्डन दिले. तर, काम करणे सोपे होईल. वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मदत होईल.

हेही वाचा – पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती? नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

उद्योग बाहेर जाण्याची भीती

चाकण परिसरात सुमारे १५ लाख कामगार काम करत आहेत. सरकारने गांभीर्याने वाहतूक समस्येची दखल घ्यावी. अपुरे रस्ते असल्याने वाहतुकीवर ताण येतो. कंपन्यांच्या उत्पादनाचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी काही कंपन्यांनी त्यांचे उद्योग गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या शेजारील राज्यांमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले की, बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत असून, चाकण परिसरात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry in chakan in a posture to exit what exactly is the reason pune print news ggy 03 ssb