नागपूर : आमदार मिर्झांभोवतालचे संशयाचे ढग गडद; ‘आरटीओ’ लाच प्रकरणात धक्कादायक तपशील उघड

आरोपी दिलीप खोडे आणि शेखर भोयर यांची काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्याशी रविभवन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यापूर्वीच भेट झाल्याची माहिती पुढे येत आहे.

Dilip Khode RTO bribery case
आमदार मिर्झांभोवतालचे संशयाचे ढग गडद; ‘आरटीओ’ लाच प्रकरणात धक्कादायक तपशील उघड (image -representational/indian express)

नागपूर : नागपूर (शहर) आरटीओ अधिकाऱ्याकडून २५ लाख रुपये लाच घेणाऱ्या आरोपी दिलीप खोडे आणि शेखर भोयर यांची काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्याशी रविभवन येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यापूर्वीच भेट झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे खोडेला ओळखत नसल्याच्या डॉ. मिर्झांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांचे नाव समोर करून खोडे आणि भोयर यांनी नागपूरच्या आरटीओकडून रविभवनच्या इमारत क्रमांक १ (खोली क्रमांक २०) मध्ये २५ लाख रुपये लाच घेतली. याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने डॉ. मिर्झा यांची बाजू जाणून घेतली असता त्यांनी आरोपी खोडेला ओळखत नाही, तर फरार आरोपी भोयरशी केवळ परिचय असल्याचा दावा केला होता. रविभवन परिसरातील पडताळणीत मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे. त्यानुसार २८ मार्चला एसीबी सापळ्याच्या काही तासांपूर्वी आमदार डॉ. मिर्झा हे रविभवनात त्यांच्या नावाने आरक्षित असलेल्या खोली क्रमांक ४५ मध्ये आले. यावेळी खोलीत लाचखोर खोडे आणि भोयर उपस्थित असल्याचे कळते. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी खोलीत तक्रारदार आरटीओ अधिकारीही पोहोचला. त्यानंतर काही मिनिटांनी डॉ. मिर्झा तेथून सगळ्यांशी चर्चा करून निघून गेले. काही तासानंतर पुन्हा आरटीओ अधिकारी त्याच परिसरातील इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक २५ मध्ये खोडेकडे आला. येथे २५ लाख रुपयांची लाच घेताना खोडे याला एसीबीने अटक केली. दुसरा आरोपी शेखर भोयर फरार आहे.

हेही वाचा – सोन्याचे दागिने घेताय.. ‘एचयूआयडी’ क्रमांक असलेले हाॅलमार्क आवश्यक, जुन्या हाॅलमार्कच्या दागिने विक्रीवर प्रतिबंध

माझ्या बदनामीचा प्रयत्न

नागपुरातील माझे घर लांब असल्याने कधी-कधी स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी रविभवनला जातो. तारीख माहीत नाही, परंतु एकदा इमारत क्रमांक ४ मधील खोली क्रमांक ४५ मध्ये गेलो. परंतु काम होताच परतलो. येथे कुणाशी भेट वा चर्चा झाली नाही. माझा या लाच प्रकरणाशी काहीही संबंध नाही. केवळ माझी बदनामी केली जात आहे, असे आमदार डॉ. वजाहत मिर्झा म्हणाले.

हेही वाचा – अकोला : खोदकाम करताना आढळल्या तीन प्राचीन मूर्ती

न्यायालयात आरोपीने सांगितलेली माहिती ठेवली जाईल

“लाच घेताना अटक केलेल्या आरोपीला उद्या न्यायालयात हजर केले जाईल. त्यापूर्वी या प्रकरणावर बोलणे योग्य नाही. आरोपीने एसीबीला सांगितलेली सर्व माहिती न्यायालयासमोर ठेवली जाईल.” असे एसीबी, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 09:59 IST
Next Story
अकोला : खोदकाम करताना आढळल्या तीन प्राचीन मूर्ती
Exit mobile version