वर्धा : जगविख्यात व प्राचीन हार्वर्ड म्हणजे ज्ञानाचा अनमोल खजिना. सध्या ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेने जगभर गाजत आहे.
हे विद्यापीठ तसे प्राचीन. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेची मोहीम सुरू होण्यापूर्वी म्हणजे १६३६ साली या विद्यापीठाची स्थापना. या विद्यापीठात धर्मविरोधी भावना वाढीस लागल्याचा ठपका ट्रम्प प्रशासनाने ठेवला. पण विद्यापीठाने हा आरोप धुडकावून लावल्याने २२० कोटी डॉलर्सचे अनुदान थांबविण्यात आले. अमेरिकन सरकार विद्यापीठास देत असलेल्या ९०० कोटी डॉलर्सपैकी ७०० कोटी डॉलर्स हे विद्यापीठाच्या बोस्टन, केंब्रिज व मॅसेच्यूसेटस या केंद्रावर खर्च होतात. या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशोधन कार्य चालते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापैकीच मॅसेच्यूसेटस या केंद्रात किया उर्फ भार्गवी उमानाथ यादव ही भारतीय कन्या झळकली. ती येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाची वैद्यकीय शाखेत अंतिम वर्षात शिकत आहे. तिची प्रख्यात गुगल कंपनीतर्फे निवड झाली. सोबत न्यूयॉर्क, सिंगापूर, दक्षिण कोरिया व एक अमेरिकन उद्योजक अशी पाच संशोधकांची ही ‘ कार्डीओ गार्डीयन ‘ चमू. त्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले. लवकरच त्याचे पेटंट मिळणार.

काय आहे त्यात विशेष ?

तर हृदयरोग निदान तंत्र. ज्यांना एकदा हृदय विकाराचा झटका येतो अशा रुग्णांना वर्षाभरात दुसरा झटका येत असल्याचे वैद्यकीय निरीक्षण आहे. त्यापैकी ८० टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. जर लवकर निदान झाले तर ते वाचू शकले असते का, ही शंका व त्यावर शोधण्यात आलेले हे उत्तर आहे. रुग्णाची संकलित माहिती ठेवून त्याआधारे हे सॉफ्टवेअर काम करणार. अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड म्हणून आरोग्य प्रणाली आहे. त्यामार्फत देखरेख ठेवल्या जाते. आता त्यास कियाने संशोधित केलेले सॉफ्टवेअर जोडल्यास अचूक व लवकर निदान होत संभाव्य हार्टअटॅक टाळल्या जाणार.

हृदय रुग्णांसाठी हे फार मोठे वरदान ठरणार असल्याचे किया सांगते. जगात दरवर्षी दीडशे कोटीवर लोकांना हृदयविकाराचे झटके येतात. त्यापैकी १४ टक्के रुग्ण परत दाखल होत उपचार घेतात. पण तरीही साडेसात टक्के रुग्ण बळी पडतात. भविष्यात हा आकडा आपल्या सॉफ्टवेअरने कमी होण्याचा तिला विश्वास आहे. किया ही दिल्लीत स्थायिक एका सैन्याधिकाऱ्याची कन्या आहे. मेघे विद्यापीठात शिकत असतानाच वैद्यकीय नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची तिला आवड निर्माण झाली. तीचे एक संशोधन बाली येथे झालेल्या कार्यशाळेत चर्चेत आले होते. त्याच आधारे तिची गुगलने हार्वर्डसाठी निवड केली. या सर्व कार्यास मुख्य प्रेरणा अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव सर यांचीच लाभल्याचे किया नमूद करते. आमच्यासाठी ते हक्काचे व्यासपीठ आहे. संदीप सर विद्यार्थ्यांसाठी वेळ काढतातच, अशी प्रांजळ भावना ती व्यक्त करते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kia bhargavi umanath yadav harvard ai based software research heart disease diagnosis before an attack pmd 64 ssb