बुलढाणा: मागील सुमारे अडीच महिन्यापासून बिबट्यांमुळे गाजणाऱ्या गिरडा गावात (वन वर्तुळात) वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा एक बिबट अडकला आहे.ही मादी बिबट असून तिला मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गतच्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्य मध्ये सोडण्यात येणार आहे. अजिंठा पर्वत राजीवर वसलेल्या बुलढाणा तालुक्यातील गिरडा हे गाव घनदाट जंगलाला लागून आहे. गावकऱ्यांच्या शेत जमीनी  जंगलाला लागून आहे.  बुलढाणा वन परिक्षेत्र  अंतर्गत येणाऱ्या गिरडा वन वर्तुळातील  घनदाट जंगलामुळे या परिसरातील रहिवासी आणि शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचे अधूनमधून दर्शन होते. यात बिबट,अस्वल, तडस सारख्या हिंस्त्र प्राण्यांचा समावेश आहे. मानवी वस्त्या वन्य प्राण्यांच्या अधिवास नजीक आल्याने  अलीकडच्या काळात मानव-प्राणी संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला.

शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे…

मात्र मागील २९ सप्टेंबर २०२४ रोजी या संघर्षाचा कळस पहावयास मिळाला. गिरडा जवळच असलेल्या आपल्या शेतात काम करणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने भरदिवसा हल्ला चढविला.तसेच सुभाष याला नजीकच्या जंगल पर्यंत फरफटत नेले होते. या घटनेत  शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरुण शेतकऱ्याचा अकाली  आणि भीषण मृत्यू झाल्याने  परिसरातील नागरिक व शेतकरी या घटनेमुळे भयभीत झाले होते.

हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…

या पार्श्वभूमीवर वन विभागाने  गिरडा वन वर्तुळात तीन ठिकाणी पिंजरे लावले. तसेच वन विभाग कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली. तसेच विविध उपाय योजना राबविण्यासाठी  गावातील तरुणांची देखील मदत घेण्यात आली.

‘ती’ अडकली, ‘तो’ रेंगाळला

दरम्यान गाव परिसरात लावण्यात तीन पैकी  एका पिंजऱ्यात काल  संध्याकाळी उशिरा पुन्हा एक बिबट अडकला! पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडल्याने जोराचा आवाज आल्याने परिसरातच असलेले  वनरक्षक प्रदीप मुंडे व इतर वन  कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली. गावकरी आणि शेतकरी देखील  घटनास्थळकडे धावत आले.  यावेळी एक  मादी जातीचे बिबट पिंजऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले. दरम्यान  दुसरा बिबट्या पिंजऱ्या जवळ वावरत असल्याची बाब निदर्शनास आली.  कर्मचारी आणि गावकरी आल्याने ‘त्या’ बिबट्याने जंगला कडे धूम ठोकली. मोठ्या संख्येने जमा झालेल्या  गावकऱ्यांना  वन कर्मचाऱ्यांनी  दूर राहण्याचे आवाहन केले.  या घटनेची माहिती  मिळताच बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) अभिजीत ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह  गिरडा गावात दाखल झाले होते. पिंजऱ्यात अडकलेल्या या बिबट्ला  बुलढाणा येथील चिखली राज्य महा मार्गावरील उपवनसंरक्षक कार्यालयात आणण्यात आले . माहिती मिळताच बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे हे देखील उपवनसंरक्षक कार्यालयात पोहोचले. त्यांनी आवश्यक ती माहिती वन विभागाकडून घेतली. या मादी बिबटला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील अंबाबरवा अभयारण्य मध्ये सोडण्यात येणार असल्याचे  ‘आरएफओ’ अभिजित ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा >>>गडचिरोली जिल्हा खनिज निधीवर नागपुरातील आमदारांचा डोळा?; जिल्हाबाहेरील कंत्राटदारांची रेलचेल वाढली

सहा बिबट जेरबंद

मागील दोन अडीच  महिन्यात गिरडा ‘सर्कल’ मध्ये बिबट चा वावर वाढला आहे.   वन विभागाने तब्बल सहा बिबट पकडले आहे.सदर कारवाई बुलढाणा उप वनसंरक्षक (डीएफओ) सरोजा गवस,’एसीएफ’ अश्विनी आपेट व बुलढाणा ‘आरएफओ’ अभिजीत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल स्वप्निल वानखेडे, वनरक्षक प्रदीप मुंडे, ‘रेस्क्यू टीम’चे संदीप मडावी,दीपक गायकवाड, अमोल चव्हाण, प्रवीण सोनवणे वनमजूर दीपक सोनवणे, प्रवीण तायडे, अरुण पंडित,शुभम शेळके,  राजेंद्र गायकवाड, किरण गायकवाड यांनी पार पाडली.