वन्यप्राणी सफारीच्या भरवशावर वर्षाला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणारे गोरेवाडा प्रशासन, त्याच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत मात्र वारंवार निष्काळजीपणा करीत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जखमी झालेला बिबट अजूनही पिंजऱ्यात परतलेला नाही. मात्र, ‘तो आम्हाला झाडावर चढलेला दिसला, म्हणजे तो सुरक्षित आहे’ असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर : नियम डावलून शहरात फटाक्यांची दुकाने !

यात वन्यजीव संरक्षण अधिनियमासोबतच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाची देखील पायमल्ली केली जात आहे.बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात ९ ऑक्टोबरला सायंकाळी एक बिबट्या स्वयंचलित प्रवेशद्वारात अडकला. पर्यटकांचे वाहन बिबट सफारीतून अस्वल सफारीत प्रवेश करताना ही घटना घडली. बिबट वेदनेने विव्हळत असल्याचे पर्यटकांनी पाहिले. प्राणिसंग्रहालयाचे अभिरक्षक दीपक सावंत यांनी प्रवेशद्वाराचे रिमोट हाती घेतले, पण प्रवेशद्वार मोकळे होण्याऐवजी आणखी जवळ आले आणि त्यात बिबट आणखी दबले. थोड्या वेळाने वेदनेने विव्हळत बिबट्या लगतच्या झुडपांमध्ये शिरला. या स्थितीत प्राणिसंग्रहालयाच्या अभिरक्षकाने सफारी तात्काळ थांबवून त्या जखमी बिबट्याचा शोध घेणे अपेक्षित असताना सफारी तशीच सुरू ठेवण्यात आली.

हेही वाचा >>>नागपूर : ‘लिंक’ उघडताच वीज ग्राहकाचे २.१४ लाख लंपास

घटनेच्या चार दिवसानंतर गोरेवाड्याचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत यांनी, बिबट्या आता पूर्णपणे तंदुरुस्त असून आम्हाला तो झाडावर चढलेला दिसला असे सांगितले. प्रत्यक्षात दहा दिवस होऊनही मादी बिबट प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यात परतलेले नाही. यापूर्वीही दोनदा बिबट्या अनेक दिवसांपर्यंत पिंजऱ्यात परतलेला नव्हता. मात्र, तो तंदुरुस्त होता, हा बिबट जखमी आहे. अधिसूची एकमधील प्राणी असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार तात्काळ शोध घेऊन त्याची आरोग्य तपासणी करणे आवश्यक होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी खायला देणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>>नागपूर : अजित पारसेचा व्यसनमुक्ती केंद्रात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

वनखाते जंगलातील जखमी वन्यप्राण्यांना बेशुद्ध करुन त्यांच्यावर उपचार करत असताना, प्राणिसंग्रहालयातील जखमी बिबट्याबाबत गोरेवाडा प्रशासन हलगर्जीपणा दाखवत आहे. या संपूर्ण प्रकरणाला प्राणिससंग्रहालयाच्या कंत्राटी अभिरक्षकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. यापूर्वीदेखील बाहेरील बिबट्याने आत शिरून काळविटाची शिकार केली होती. तृणभक्षी प्राण्यांच्या सफारीत आग लागली आहे. याबाबत वनविकास महामंडळ तसेच गोरेवाडा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे.

हेही वाचा >>>नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४८७ कोटी, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार

गोरेवाडा हे आंतररारष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय आहे आणि राज्यभरातून पर्यटक याठिकाणी येतात. पर्यटकांच्या सुविधांची प्रशासन जेवढी काळजी घेत आहे, तेवढीच प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी अभिरक्षकांची आहे. मुख्य म्हणजे, अधिसूची एकमधील प्राण्यांबाबत घटना घडली असतानाही राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांनी देखील दखल घेतलेली नाही. गोरेवाडा प्रशासन वारंवार अभिरक्षकाला पाठीशी घालत आहे.– कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard injured due to laxity of administration amy