गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगावमध्ये गुरुवारी एका ५ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. या घटनेला तीन दिवस लोटून सुद्धा हल्ला करणारा बिबट हा अद्याप ही वन विभागाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे गोठणगाव परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. तो लहान मुलांवर हल्ला करत आहे. गेल्या दीड वर्षात बिबट्याने तीन निष्पाप मुलांवर हल्ला केला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. या भयानक बिबट्याने इतकी दहशत निर्माण केली आहे की गोठणगाव वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थ अंधार पडताच त्यांच्या घरातच बंदिस्त होतात. वन विभागाचे पथक दिवसरात्र गस्त घालत आहे, आणि बिबट्याला पकडण्यासाठी विविध शक्कल लढविली जात आहे. विविध उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु आतापर्यंत वन विभागाला या बिबट्या ला पकडता आलेला नाही.
अर्जुनी मोरगाव तहसीलच्या गोठणगाव वनपरिक्षेत्रातील संजयनगर येथे गुरुवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५:३० वाजता एक ५ वर्षांचा चिमुकला अंश प्रकाश मंडल बाहेर आल्यावर बिबट्याने त्याला पळवून नेले. त्याचा वेदनादायक मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये वन विभागाविरुद्ध इतका संताप निर्माण झाला की आंदोलकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक गाडीला आग लावण्या पर्यंत मजल मारली होती. या परिसरात बिबट्याने गेल्या दीड वर्षात गोठणगाव वनक्षेत्रात चार निष्पाप मुलांवर हल्ला केला आहे. वन विभागाद्वारे या बिबट्याच्या बंदोबस्त केल्यानंतरच गोठणगाव परिसरातील लोक सुटकेच्या नि: श्वास घेतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पुलावर मांडला चक्क वाघाने ठिय्या; भुसारीटोला, पळसगाव राका परिसरात दहशत : बंदोबस्त करण्याची मागणी
अर्जुनी मोरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता सडक अर्जुनी तालुक्यातील तालुक्यातील राका-पळसगाव , भुसारीटोला मार्गावरील एका पुलावर वाघाने ठाण मांडले. त्यामुळे परिसरात पट्टेदार वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात वाघाचा वावर असल्याने गावकऱ्यांना रात्री गावात गस्त घालण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दिवसापासून ग्रामस्थ रात्री दरम्यान हातात काठी घेऊन गस्त घालतात.
गत १५ दिवसांपूर्वी भटूटोला येथे शेतात काम करीत असलेल्या रामदास कापगते शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला जखमी केले होते. क्षणभर भांबवलेल्या शेतकऱ्याने या हल्ल्यातून कसा बसा सावरत आरडाओरड केल्याने वाघ पळाला. शेतकऱ्यांनी याची वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शोध मोहीमराबविली. मात्र, सदर वाघ हा परिसरात आढळला नाही. मात्र आता तोच वाघ पुनःपुन्हा परिसरात दिसत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाला काही गावकऱ्यांनी पळसगाव-राका मार्गावरील एका पुलावर ठाण मांडून बसल्याचे पाहिले. त्यामुळे राका, पळसगाव, भुसारीटोला या परिसरांतील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.
धास्तीमुळे शेतीकाम खोळंबले
भटूटोला येथील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी जवळच्या पळसगाव शाळेत जातात. मात्र याच परिसरात वाघाचा वावर असल्याने मुले घरी येईपर्यंत पालकांना काळजी लागून राहिलेली असते, तर काही पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणेही बंद केले आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या परिसरात वाघाच्या भीतीमुळे शेतीकामेही खोळंबली आहेत.