चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मार्डा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या चॉकलेटमध्ये २८ ऑगस्ट रोजी जिवंत अळ्या आणि सोंडे आढळले आहे.
असाच प्रकार आर्वी येथे घडल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवीताशी खेळणा-या या पुरवठाधारकावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी गावक-यांनी केली आहे. दरम्यान राजुरा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांनी यासंदर्भात अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केल्याची माहिती मिळाली असून राजुरा, कोरपना व जीवती तालुक्यात या चाॅकलेटचे वितरण बंद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> ऊर्जामंत्र्यांशी चर्चेनंतर कंत्राटी कामगार संघटनेचे उपोषण स्थगित
राजुरा तालुक्यातील मार्डा या गावात इयत्ता १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून २८ ऑगस्ट रोजी चॉकलेटचे वाटप करण्यात आले होते. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी हे चांकलेट फोडून पाहिले असता त्यात जिवंत अळ्या व सोंडे आढळले. विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली. यासंदर्भात मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी राजुरा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी मनोज गौरकर यांना माहिती दिली.
हेही वाचा >>> Dead Lizard Found In Spices : धक्कादायक! पोषण आहाराच्या मसाल्यात चक्क पाल; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ…
त्यांनी तातडीने याची दखल घेत मार्डा आणि आर्वी येथील चॉकलेट सिल करून तपासणीसाठी पाठविले असून यासंदर्भात अहवाल चंद्रपूर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांना पाठविला आहे. या घटनेनंतर तातडीने राजुरा तालुक्यातील चॉकलेट वाटप बंद करण्यात आले आहे.
शासकिय निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना व जीवती या तिन तालुक्यातच चाॅकलेट वाटप करण्यात येत आहे. मात्र या चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या आणि सोंडे आढळल्याने या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वितरण थांबविण्यात आले असून चाॅकलेट परत मागविले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत असा खेळ करणा-या प्रकरणाची चौकशी करून संबधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. हे पोषण आहार आहे की विद्यार्थ्यांना आजारी करण्याचा आहार, अशी संतप्त प्रतिक्रिया या पालकांनी व्यक्त केली आहे.