आमदारही सक्रिय; अंतिम निर्णय ‘वाडय़ा’वर
भारतीय जनता पक्षाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षपदासाठी दावेदाराची संख्या वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थानिक आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पक्षाच्या कोअर कमिटीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी समितीने या संदर्भातील चेंडू ‘वाडय़ा’कडे सरकवला आहे. आता ‘वाडा’च या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. येत्या १० जानेवारीला मंडळ अध्यक्षाची नियुक्ती होणार आहे, हे येथे उल्लेखनीय.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सहाही मंडळ अध्यक्षांनी केलेली कामगिरी बघता त्यांना पुन्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जावी, असा मतप्रवाह पक्षात होता. मात्र पक्षातूनच याला विरोध झाला. शहर कार्यकारिणीतील काही पदाधिकाऱ्यांनी मंडळ अध्यक्ष बदलविले जावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली.
सध्या उत्तर नागपूर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी विक्की कुकरेजा यांच्याकडे, पूर्व नागपूरची जबाबदारी नगरसेवक बाल्या बोरकर यांच्याकडे, पश्चिम नागपूरची संजय बंगाले, दक्षिण-पश्चिमची किशोर वानखेडे, दक्षिण नागपूरची कैलास चुटे यांच्याकडे आणि मध्य नागपूर मंडळाचे अध्यक्ष म्हणून विलास त्रिवेदी यांच्याकडे जबाबदारी आहे. यावेळी मंडळ अध्यक्षाची जबाबदारी देताना पक्ष निष्ठा हा महत्त्वाचा निकष असणार आहे. त्यामुळे विद्यमान काही नावे बदलण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व नागपुरातील काही पदाधिकाऱ्यांनी विद्यमान अध्यक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिममध्ये अशीच परिस्थिती आहे. प्रत्येक मंडळातून अध्यक्षपदासाठी त्या त्या मंडळातील कोअर कमिटीने तीन नावे दिली असून त्यापैकी एकाची निवड केली जाणार आहे. पूर्व, दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि उत्तर नागपुरातील अध्यक्षपदासाठी पाच नावे समोर आली आहेत. मंडळ अध्यक्षाच्या निवडीत आमदारही सक्रिय भूमिका बजावत आहेत. आपल्या मर्जीतील आणि समर्थकच मंडळ अध्यक्ष व्हावा यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही मंडळातून तर आमदारांनी शिफारस केलेल्या नावालाच विरोध आहे. ज्यांची यादीमध्ये नावे नाही अशा कार्यकर्त्यांनी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे.
पक्षाच्या कोअर कमिटीसमोर सहाही विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षपदासाठी शिफारस केलेल्या नावांची यादी प्राप्त झाली आहे.
सहा विधानसभा मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही पक्षाची नियमित प्रक्रिया आहे. त्यासाठी कोअर कमिटीसमोर प्रत्येक मतदारसंघातून तीन नावे आली असून त्यापैकी एकाची निवड होणार आहे. कोणाची निवड करायची याबाबत अंतिम निर्णय हा कोअर कमिटीचाच असणार आहे.
– आमदार कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष, भाजप, नागपूर