देवेंद्र गावंडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कडव्यांकडून विखारी विचाराचा प्रसार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. डावे असोत वा उजवे, याच पद्धतीचा वापर करत द्वेषाचे बीज पेरतात. यासाठीचे कार्यक्रम एकतर गुप्तपणे घेणे, सार्वजनिकरित्या घेतलाच तर त्यात नेमके कोण उपस्थित राहील याचे काटेकोर नियोजन करणे, माध्यमांना अशा कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवणे, नेमकी माहिती बाहेर येऊ न देणे, यातून होणारा अपप्रचार प्रसारासाठी अनुकूल कसा ठरेल याकडे बारकाईने लक्ष देणे, माध्यमावर लादलेल्या बंधनाची चर्चा व्हायला लागली की समाजाचे लक्ष आपसूकच अशा कार्यक्रमाकडे वेधले जाते. यातून निर्माण झालेल्या सार्वत्रिक उत्सुकतेचा फायदा घेत ‘विखार’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची दक्षता घेणे, या प्रसारावरून समाजात घुसळण सुरू झाली की नवे अनुयायी शोधणे, त्यांना गळाला लावणे, एकूणच समाजाचे विवेकी संतुलन कसे ढळेल यासाठी प्रयत्न करणे. कडव्या विचारवाद्यांनी जगभरात लोकप्रिय केलेल्या या पद्धतीशी संभाजी भिडेंचा विदर्भदौरा जोडून बघा. तुम्हाला अनेक मुद्यांवर साम्य दिसेल. वादग्रस्त वक्तव्ये व भिडेंचा संबंध तसा जुना. ते जिथे जातील तिथे वाद ठरलेला. त्यामुळे भिडे काय बोलतात हे फार महत्त्वाचे नाही, यापेक्षा त्यांचे कार्यक्रम कोण आयोजित करते? त्यांच्या पाठीशी नेमकी कोणती शक्ती, अथवा परिवार उभा आहे? त्यांच्या दौऱ्याचे नियोजन कोण करते? त्यांना ऐकायला जाणारे नेमके कोण? याची उत्तरे शोधायला गेले की सारा पटच उलगडतो.

भिडेंच्या प्रतिष्ठानचा फारसा जोर विदर्भात नाही. त्यांच्या अनुयायांची संख्याही मोेजकीच. तरीही त्यांना विदर्भात यावेसे वाटते, रोज एका शहरात विखार व्यक्त करावासा वाटतो. महात्मा गांधींविषयीच्या वक्तव्यासाठी ते सध्या उजव्यांची प्रयोगशाळा झालेल्या अमरावतीचीच निवड करतात. नंतर याच वक्तव्याचा पुनरुच्चार करत पश्चिम विदर्भात जागोजागी फिरतात. हा सारा घटनाक्रम निव्वळ योगायोग असे कसे समजता येईल? त्यांच्या ठिकठिकाणी झालेल्या सभांचे संयोजक बघा. त्यांची पार्श्वभूमी तपासली तर ते कोणत्या विचाराच्या पक्षात, परिवारात सक्रिय आहेत हे सहज लक्षात येते. भिडेंचे भाषण ऐकायला जाणाऱ्या वर्गाकडे बारकाईने बघा. बहुतांश सारे उजव्या विचाराला मानणारे. यात पक्षाचे पदाधिकारी, परिवारातील विविध संघटनांचे प्रमुख, सक्रिय कार्यकर्ते असा सारा गोतावळा तुम्हाला दिसेल. आता कुणी म्हणेल की एखाद्याचे मत, विचार ऐकण्यात चूक काय? प्रश्न अगदी रास्त. मात्र असा युक्तिवाद परिपूर्ण ठरत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे भिडेंचे बेताल बोलणे. गांधी, नेहरू असो वा फुले, त्यांनी केलेल्या कार्याविषयी मतभिन्नता असू शकते. यापैकी एखाद्याचे विचार पटणारे नाहीत असा दावा कुणी करू शकतो. मात्र हे महापुरुष कुणाच्या पोटी जन्माला आले? त्यांचे वडील कोण? याविषयीची बडबड कशी काय खपवून घेतली जाऊ शकते? भिडे असेच बोलणार हे ठाऊक असून सुद्धा कथित राष्ट्रप्रेमी मंडळी त्यांच्या सभांना गर्दी करत असतील तर मग त्यांना गांधी प्रात:स्मरणीय कसे? एकीकडे त्यांच्यासारखा महापुरुष झाला नाही असे अधिकृत व्यासपीठावरून म्हणायचे व दुसरीकडे त्याच राष्ट्रपित्यावर अश्लाघ्य शब्दात केलेली शेरेबाजी मिटक्या मारत ऐकायची, टाळ्या वाजवायच्या. फार छान म्हणत समाधान व्यक्त करायचे. हे कसे? असला दुटप्पीपणा नेमका कशासाठी? स्तुतीसाठी अधिकृत तर निंदानालस्तीसाठी अनधिकृत व्यासपीठांचा वापर करणे हा जहालांचा आवडता छंद. त्याचेच दर्शन या दौऱ्यात घडले असा कुणी अर्थ काढला तर त्यात चूक काय? स्वातंत्र्यलढ्यात आपण सहभागी नव्हतो ही मनात सतत बोचत असलेली सल एकदाची समजून घेता येईल पण ती दूर करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या चारित्र्यहननाचा मार्ग योग्य कसा असू शकतो? नव्हतो आम्ही स्वातंत्र्यलढ्यात पण आता देशविकासात सक्रिय योगदान देतोय हे समाधान या मंडळींना पुरेसे वाटत नाही का?

इतिहासाचे मूल्यमापन प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे असू शकते. त्यावरून निष्कर्ष काढण्याचा अधिकार प्रत्येकाला. ते न करता नुसती बदनामी करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याचे समर्थन कसे काय केले जाऊ शकते? भिडेंचे म्हणणे अमान्य, राष्ट्रपित्याचा अपमान सहन केला जाणार नाही असे एकाने म्हणायचे व त्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने भिडेंचा अपमान सहन केला जाणार नाही असे म्हणायचे. हा विरोधाभास नेमका काय दर्शवतो? यावरून भिडेंना नेमकी कुणाची फूस याचे उत्तर एखाद्याने दिलेच तर त्यात चुकीचे ते काय? भिडेंचे म्हणणे मान्य नाही पण त्यांचा विरोधही आम्ही करणार नाही असे वक्तव्य एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केले. याचा नेमका अर्थ काय? हा ताकाला जाऊन भांडे लपवण्याचाच प्रकार. जे हयात नाहीत त्यांच्या विचारावर टीकाटिप्पणी होऊ शकते. तसे न करता त्यांच्या जन्मावरून बेछूट विधाने करणे, तेही सारे पुरावे उपलब्ध असताना, हे नैतिकतेच्या कोणत्या व्याख्येत बसते? मृत व्यक्तीविषयी अपशब्द वापरू नये हा धर्माने दिलेला संस्कार याचे विस्मरण उठसूठ धर्माचे नाव घेणाऱ्यांनाच का होते? गांधी व नेहरूंनी त्या स्थितीत देशासाठी काय केले याचा समग्र इतिहास उपलब्ध आहे. त्यांनी केलेले चूक की बरोबर यावरून वाद होऊ शकतात. मात्र या दोघांना खलनायक ठरवणे, त्यांना विशिष्ट धर्माचे लेबल लावणे यातूनच ध्रुवीकरण होते असे उजव्यांना वाटते काय? भिडे म्हणाले, देशाच्या विकासात नेहरूंचे नखाएवढेही योगदान नाही. मग भिडेंचे योगदान काय? विखारी विचाराचा प्रसार करणे याला विकासातले योगदान समजायचे काय?

तरुणाईला गड, किल्ल्याचे वेड लावणे, छत्रपतींचा इतिहास शिकवणे हे त्यांचे योगदान एकदाचे समजून घेता येईल पण त्यापलीकडे जाऊन ते महापुरुषांची बदनामी करत असतील तर त्यामागचा बोलविता धनी कोण? उजव्या विचाराला फायदा पोहचवण्यासाठी ते जर हा उपद्व्याप करत असतील तर त्यांचे पाठीराखे नेमके कोण याचे उत्तर सहज सापडते. राज्यात दुसऱ्या कुणा पक्षाची सत्ता असती तर भिडे याच पद्धतीने फिरले असते काय? गांधी-नेहरूंनी या देशासाठी जे काही केले ते विसरण्यासारखे नाही. हा इतिहास पुसून टाकण्यासाठी भिडेंना फिरवले जातेय का? तसे असेल तर त्यातून फार काही साध्य होण्यासारखे नाही. झालेच तर आज समाजाला भेडसावणाऱ्या गरिबी, महागाई, शेतीचे प्रश्न, रोजगार या समस्यांची तीव्रता थोडीफार कमी होऊ शकते. ती व्हावी, लोकांचे लक्ष त्यापासून विचलित व्हावे यासाठी भर पावसाळ्यात हा दौरा आयोजित केला असेल का? केला तर त्यामागचे डोके नेमके कुणाचे? बेताल विधानांची राळ उठवून तुम्ही क्षणकाळ समाजाला वास्तवापासून दूर नेऊ शकता, दीर्घकाळासाठी नाही याची कल्पना या डोक्यांना नसेल का? असेल तर ही नसती उठाठेव कशासाठी? त्यामुळे भिडेंना बाजूला ठेवा, त्यांच्यामागे उभी असलेली शक्ती नेमकी कोणती यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar sambhaji bhide vidarbha tour to spread the idea of divisiveness ysh