सभागृहात प्रचंड हशा, तेवढेच क्षणभर गांभीर्य. साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू.. लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सकाळपासून सुरू झालेले आसू आणि हसूचे हे वातावरण सायंकाळपर्यंत कायम होते. निमित्त होते सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीचे!
विभागीय फेरीची सुरुवात गंभीर विषयाने झाली, पण दुसऱ्याच नाटकाने सभागृहात हशा पिकवला. कधी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट तर कधी शिटय़ांची दाद. नाटक सादर करणारे विद्यार्थी कलावंत आणि त्या विद्यार्थी कलावंतांना दाद देणारेही विद्यार्थीच. लोकसत्ताने लोकांकिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या या संधीचा फायदा त्यांनी घेतला आणि रसिकप्रेक्षकांनीही त्यांना तितकीच दाद दिली. हा रसिकप्रेक्षक त्यांच्याच वयाचा नव्हता तर त्यांच्या आधीच्या आणि त्याही आधीच्या पिढीचा सहभाग होता. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद बघून नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थी कलावंतांचा अभिनय आणखीच बहारदार होता. नेपथ्यासहीत झालेल्या आजच्या विभागीय अंतिम फेरीच्या सादरीकरणाने वेगळीच रंगत भरली. हा उत्साह प्रत्येक नाटकागणिक वाढत गेला आणि सभागृह हश्या, टाळ्यांनी दुमदुमून गेले. यावेळी सभागृहातीलच काही विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादानंतर त्यांनी पुढील वर्षी सहभागी होण्याची मनीषा व्यक्त केली. एवढेच नव्हे तर कित्येकजण सभागृहातून बाहेर पडताना त्या नाटकातले संवाद म्हणत पायऱ्या उतरताना दिसले. जी नाटके विभागीय अंतिम फेरीत आली नाहीत, त्या नाटकातील कलावंतसुद्धा यावेळी उपस्थित होते. पुढल्या वर्षी त्यांनीही विभागीय अंतिम फेरीत येण्यासाठी आतापासून तयारी करणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ रसिकप्रेक्षकांनीही या विद्यार्थी कलावंतांचे भरभरुन कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाटकाच्या चमू स्पध्रेसाठी पूर्ण तयारीने आल्या आहेत. रंगमंचाचा ज्या पद्धतीने वापर होत आहे तो पाहून सर्वानी खूप मेहनत घेतल्याचे जाणवत आहे. नवीन मुलांमध्ये कलागुण आहेत, पण त्यासाठी त्यांना पूर्ण तयारी करावी लागेल. रंगमंचाचा त्यांनी पूर्ण वापर केलेला आहे.
मुकुंद वसुले
सादरीकरणात सफाई आहे, रंगमंचाची समज त्यांच्यात जाणवत आहे. खुपदा संवाद पाठ केले म्हणजे नाटक झाले असे दिसून येते. याठिकाणी मात्र विद्यार्थी पूर्ण तयारीने आले आहेत. यापुढे एकांकिकेची तालीम दहा-पंधरा दिवस आधी नव्हे तर महिनाभर आधीपासून करावी.
पराग घोंगे
विद्यार्थी कलावंतांमधील ऊर्जा प्रचंड जाणवते आहे. विशेष करून समाजाशी निगडीत विषयांवर आधारित नाही, पण त्याचा थोडासा गंध त्यांनी नाटकामध्ये भरला आहे. या एकूणच नाटकांमधून विद्यार्थ्यांमधील स्पर्धा जाणवते आहे आणि तीच त्यांना पुढे घेऊन जाणार आहे.
प्रवीण तरडे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika 2015 in nagpur