सत्ता, त्यातून मिळालेले अधिकार, संपत्ती, सर्व बाबतीतील सुबत्ता हे सारे वैभव एकत्र नांदणाऱ्या घरातील महिला सबला असतात का? या सुबत्ततेतून त्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा खरोखर रुंदावतात का? घरात आणि बाहेर वावरताना त्यांना समानतेची वागणूक मिळते का? अशा सुबत्तेमुळे समाजात सुशिक्षित व संस्कारित असा मान मिळालेले या घरांमधील पुरुष महिलांना आदर व सन्मानाची वागणूक देतात का? त्यांच्या वागणुकीत घरात व सार्वजनिक जीवनात समानता दिसते का? दिसत नसेल तर ते समाजात मुखवटे घालून वावरतात असे समजायचे काय? पती हयात असेपर्यंत सबला, एकदा तो गेला की अबला हे सर्वार्थाने दृढ सामाजिक समीकरण या घरांनाही लागू पडते काय? सारी सुखे पायाशी लोळण घालत असूनसुद्धा केवळ पतीनिधन हा एकच मुद्दा एखाद्या स्त्रीला अबला करून टाकतो हे वास्तव या मोठ्या घरांमध्येही आढळते काय? असेल तर समृद्धी, उन्नती व्यक्तीला अधिक परिपूर्ण बनवते, प्रत्येकाकडे न्याय नजरेने बघण्याची सवय देते हे खरे कसे मानायचे? हे सारे प्रश्न उपस्थित झालेत ते प्रिया फुके यांच्या एका तक्रारीमुळे. त्यावर काय कारवाई करायची ते पोलीस बघतील. त्या तक्रारीत तथ्य किती हेही यथावकाश समोर येईल. कोण खरे व कोण खोटे हे सुद्धा समाजाला दिसेल पण प्रश्न असा आहे की अशी वेळ प्रियावर का यावी?

या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले की श्रीमंतांचा दांभिकपणा व गरिबांचे वास्तववादी जगणे ठसठशीतपणे समोर येते. स्त्रियांना स्वातंत्र्य व समानतेची वागणूक नेमकी कुठे मिळते? श्रीमंतांच्या घरात की गरिबांच्या? याचे नि:संशय उत्तर गरिबांच्या घरात असेच येते. अनेकांना हे आवडणारे नाही पण बोलण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची सहजवृत्ती स्त्रियांना गरिबांच्या घरात सहज प्राप्त होते. मग प्रश्न उरतो तो श्रीमंताच्या घरात नेमके काय घडते? याचे उत्तर प्रियाने तक्रार करून सर्वांना दिले आहे. हे मोठे पाऊल उचलण्यामागे नेमकी हीच भावना आहे असे त्या बोलून दाखवतात. श्रीमंतांच्या घरात प्रामुख्याने सुनांना प्रचंड कोंडमारा सहन करावा लागतो. बोलण्याचे स्वातंत्र्य तर जवळपास नसतेच. अधिकाराचे हनन होत असेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याची सोयही नसते. तसा प्रयत्न कुणी केलाच तर घराण्याची अब्रू, प्रतिष्ठा जाईल अशी भीती तिला दाखवली जाते. प्रियाच्या बाबतीत हेच घडले. जेव्हा सारे सहन करण्याच्या पलीकडे गेले तेव्हा तिने न्यायाचा दरवाजा ठोठावला. अशा घरातली प्रत्येक सून असे धाडस दाखवेल का हा तिला पडलेला प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अशा घरांमध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे स्त्रियांची संख्याही भरपूर असते. त्यातल्या एकीला घरच्यांकडून होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागला तर इतर स्त्रिया तिला साथ देतात का? तिच्या बाजूने उभे राहण्याची हिंमत दाखवतात का? की तिलाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करून घरातील पुरुषांना साथ देतात याचीही उत्तरे जवळजवळ नाही हेच सांगणारी. प्रियाला सुद्धा हाच अनुभव आलेला.

हेही वाचा : नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…

याच्या अगदी उलट गरिबांच्या घरात घडते. तिथे अब्रू, प्रतिष्ठा, पैसा याचे अवडंबर नसते. त्यामुळे न्याय-अन्यायाची चिकित्सा खूपच वास्तववादी पातळीवर होत असते. अन्याय स्पष्ट दिसत असेल तर इतर स्त्रिया फारशी भीती न बाळगता पाठीशी उभ्या राहतात. अशावेळी येणारा पुरुषी दबाव झुगारण्याची हिंमत त्यातल्या अनेकजणी दाखवतात. न्यायनिवाडा करण्याची वेळ आलीच तर सारे गणगोत पुढे येते. या मुद्यावरून भलेही दोन तट त्यांच्यात पडो पण मतांची मांडणी न भीता केली जाते. तरीही वाद सुटत नसेल तर कायदेशीर मार्गाची कास धरली जाते. नेमके हेच आपल्या बाबतीत का घडले नाही हा प्रियाचा प्रश्न व त्याचे उत्तर श्रीमंतीतून येणाऱ्या बडेजावपणात दडलेले. यातला दुसरा मुद्दा आहे तो समाजाचा. तो याकडे कसा बघतो यासंदर्भातला. प्रियाने तक्रार देऊन आता पंधरवडा लोटला. समाजातील कुणीही तिच्या बाजूने उघडपणे उभे राहताना दिसले नाही. ही शांतता नेमकी काय दर्शवते? एकेकाळी नागपूर हे स्त्रीवादी चळवळीचे केंद्र होते. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या या शहरात मोठ्या संख्येत होत्या. त्या कोण हे येथे नमूद करण्याची गरज नाही. वयपरत्वे त्यांच्यातील आंदोलन उभे करण्याची शक्ती क्षीण झाली असेल पण त्यांची जागा घेत सध्या समाजमाध्यमावर स्त्रीवादी म्हणून मिरवणाऱ्यांचे काय? या माध्यमावर अन्याय सहन करणार नाही अशा केवळ पोकळ गप्पा करायच्या व कृती मात्र शून्य हा ढोंगीपणा झाला. तो सध्या माध्यमी सक्रियता दाखवणाऱ्यांना मान्य आहे काय? यापैकी एकीलाही आपण प्रियाला मदत करावी असे वाटले नसेल का? तिच्याशी निदान संपर्क साधून काही मदत करण्याची तयारी दर्शवावी अशीही भावना त्यांच्या मनात आली नसेल काय? प्रिया श्रीमंत घरातली आहे, तिला कशाला मदतीची गरज अशी समजूत या सर्वांनी करून घेतली की याच श्रीमंती व राजकीय वरदहस्तामुळे पुढाकार घेण्याची या सर्वांची हिंमत झाली नाही असे समजायचे काय? जो मदतीसाठी आमच्या दारात येईल त्याचाच विचार केला जाईल अशी या सर्वांची भूमिका आहे काय? अशी निवडक नैतिकता कार्यकर्तापणाचा पराभव करणारी असते हे यांना ठाऊक नसेल काय?

हेही वाचा : नागपूर : इस्र, ‘नासा’मध्ये नोकरीचे आमिष; ६ कोटींनी फसवणूक

अगदी काही वर्षांपूर्वी अशी काही अन्यायाची प्रकरणे समोर आली की या कार्यकर्त्या धावून जायच्या. त्यातून वातावरणनिर्मिती व्हायची. सरकारी यंत्रणांवर दबाव यायचा. त्यातून अन्यायाची चौकशी निष्पक्षपणे होईल अशी हमी आपसूक मिळायची. अशा सक्रियतेमुळे ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे तेही धाकात राहायचे. यातून तडजोडीचे प्रयत्न सुरू व्हायचे. एकूणच प्रकरण मार्गी लागायचे. प्रियाच्या बाबतीत असे काहीच घडले नाही. उलट साऱ्यांनी मौन बाळगले. ही निष्क्रियता सृदृढ समाजाचे लक्षण कसे समजायचे? आता स्त्री सबला झाली आहे. तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध ती एकटी लढा देऊ शकते. तिला कुणाची गरज नाही असा समज या कथित चळवळकर्तींनी करून घेतला आहे काय? प्रगतीच्या वाटा जसजशा मोकळ्या होत आहेत तसतसा समाज आणखी बंदिस्त होत जातो. मी व माझे यापलीकडे विचार करताना कुणी दिसत नाही. त्याचा प्रभाव या महिला कार्यकर्त्यांवरही पडला असे समजायचे काय? स्त्रीपुरुष समानतेच्या कितीही गप्पा आपण मारत असलो तरी जोवर तिच्यावर अन्याय होत आहे तोवर ती अंमलात येणे शक्य नाही. अलीकडे तर या अन्यायात वाढच झालेली दिसते. अशावेळी दाद मागण्याचे धाडस दाखवणाऱ्या प्रियाला मदत करण्यासाठी कुणी पुढे येत नसेल तर हा सर्वांचा पराभव ठरतो. हेच वास्तव या प्रकरणात दिसून येते.