शेतकऱ्यांच्या देहबोलीतुन व्यक्त होणारा जहाल रोष, महिलांची लक्षणीय उपस्थिती, सरकारी धोरणांचा निषेध, सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग, कडक पोलीस बंदोबस्त, मोर्चेकऱ्यांनी बुलढाणा-चिखली राज्य महामार्ग फुललेला, अशा वातावरणात आज येथे स्वाभिमानीकृत सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा जंगी एल्गार मोर्चा निघाला.

हेही वाचा >>>गोंदिया: शिकारीसाठी जंगलात लावलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणाच्या स्पर्शाने दोन तरुणांचा मृत्यू

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजता निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर स्टेट बँक चौक परिसरात मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. रविवारी दुपारी १२ वाजता निघणारा हा मोर्चा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या हजारो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता दुपारी २ वाजता चिखली मार्गावरील मोठ्या देवीच्या मंदिरापासून मोर्चाला प्रारंभ झाला. वाजतगाजत निघालेला हा मोर्चा तहसील जवळ पोहोचला तेव्हा त्याचे एक टोक देवीच्या मंदिराजवळ होते.