Solar Explosives Company Explosion Nagpur : नागपूर : बुधवारीमध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव कंपनीत भीषण स्फोट झाला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोट इतका भीषण होता की दहा किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज पोहचला. स्फोटात दगावलेल्या कामगाराच्या शरीरीर लोखंडी सळ्यांचे तुकडे शिरले होते तर टीन पत्र्यांमुळे दोन कामगारांना त्यांचे पाय गमवावे लागल्याची माहिती आहे.

स्फोटात दगावलेल्या कामगाराचे नाव मयूर गणवीर आहे.सायरन वाजल्यानंतर तो त्याच्या विभागातून बाहेर पळत सुटला होता, मात्र त्याच वेळी स्फोट झाल्याने त्याच्या शरीरात इमारतीत वापरलेल्या सळ्यांचे तुकडे शिरले त्यामुळे तो गंभीर जखमी झाला व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.दहा किलोमीटरपर्यंत दुमदुमला आवाज स्फोटाचा आवाज तब्बल दहा किलोमीटरवर ऐकू आला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत कोसळली व मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर पडला. कंपनी परिसरातील सुरक्षा रक्षकांचे कार्यालय ,मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले. कंपनीत उभ्या असलेल्या बसची काच फुटली.

दोन कामगारांचे पाय गमवावे लागले

स्फोटामुले कंपनीच्या परिसरातील इमारतीं कोसळल्या. त्याच्या ढिगाऱ्याखाली कैलाश वर्मा व मनीष वर्मा दबल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायावर इमारतीचा लोखंडी पत्रा पडल्याने त्यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि शेवटी त्यांना पाय गमवावे लागले.पळापळ, गावकऱ्यांची गर्दी स्फोटानंतर कंपनी परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमले व आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले.

प्रशासन व पोलिसांची धावाधाव

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे, तहसीलदार राजू रणवीर, एसडीपीओ बापूसाहेब रोहोम तसेच स्फोटक, पर्यावरण, कामगार आणि सेफ्टी विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालय व कंपनीने ठरवलेल्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. काहींचा प्राथमिक उपचार कोंढाळी आरोग्य केंद्रात करण्यात आला.