मेडिकल, मेयोतील धक्कादायक प्रकार

महेश बोकडे, नागपूर</p>

मेडिकल, मेयोतील रुग्णांना देणगीतून दिल्या जाणाऱ्या फळांसह खाद्यपदार्थ वाटपासाठी ते सीलबंद असायला हवे असा नियम आहे. हा नियम पाळलाही जातो. मात्र येथील अधिकारी परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांच्या हातठेल्यावरूनच चहा-नाश्ता घेतात. अधिकाऱ्यांकडूनच अनधिकृत विक्रेत्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याने अन्न व औषध प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण खात्याकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

राज्यात केवळ नागपुरातच मेडिकल, मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये असून येथे दोन हजार आंतररुग्ण दाखल असतात तर पाच हजारांवर बाह्य़रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण, त्यांचे नातेवाईक, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची संख्या  बघता बऱ्याच अनधिकृत विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटली आहेत. या विक्रेत्यांना येथे दुकाने लावू न देण्याची जबाबदारी दोन्ही रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

येथे खाद्यपदार्थातून कुणाला विषबाधा झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विक्रेत्यांकडून येथील जागेवर अतिक्रमण केले जात असतानाही त्यांना हटवण्यात येत नाही. उलट तेथीलच चहा-नाश्त्याचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळे या विक्रेत्यांना अधिकाऱ्यांनीच नियमबाह्य़ व्यवसाय करण्याची सवलत दिली काय, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मेयोच्या परिचारिका वसतिगृहापुढे एक अनधिकृत चहा-नाश्त्याचे दुकान आहे. येथे चक्क मेयोचे अधिष्ठात्या, इतरही विभागप्रमुख चहा-पान करतात. रुग्णाच्या नातेवाईकाने हे छायाचित्र लोकसत्ताला पाठवले. दरम्यान, मेयोत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र उपाहार गृह असताना ते अनधिकृत विक्रेत्यांना प्रोत्साहन देत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘‘बहुतांश अनधिकृत विक्रेत्यांना प्रशासनाने मेयो परिसरातून बाहेर काढले आहे. एका दुकानावर कारवाईबाबत उपाहारगृहासह इतर काम करणाऱ्या मेयोतील समितीला सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच कारवाईची अपेक्षा आहे. सोबत येथील सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना यापुढे अनधिकृत विक्रेत्यांकडून काही खरेदी करू नये अशी विनंती केली जाईल.’’ – डॉ. अजल केवलिया,अधिष्ठाता, मेयो.