यवतमाळ : महायुती सरकारकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भात पत्रकारांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना छेडले असता, त्यांनी ‘आगे आगे देखो, होता है क्या?’ असे उत्तर दिल्याने राज्यात पुन्हा एकदा पक्ष फुटीची मोठी घटना घडण्याचे सुतोवाच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राठोड यांनी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेची माहिती दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी वणीत केलेल्या आरोपांबाबत विचारण केली, तेव्हा पुढे काय होणार हे बघत राहा, असे उत्तर मंत्री संजय राठोड यांनी दिले.

शिवसेना उबाठाचे आमदार, खासदार यांना आमीषं दाखवून प्रसंगी दबाव आणून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम राबविली जात असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय देशमुख यांनी वणी येथील सत्कार कार्यक्रमात नुकताच केला होता. तसेही गेल्या महिनाभरापासून शिवसेना उबाठाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिल्ली येथे शिवसेना उबाठाचे चार खासदार शिंदे गटाच्या खासदारांनी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शिवसेना उबाठामध्ये अस्थिरता असल्याचे बोलले जाते.

यवतमाळचे शिवसेना उबाठाचे खासदार संजय देशमुख यांनी वणी येथे सार्वजनिक कार्यक्रमात ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम सुरू असल्याचेच संकेत दिल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ‘आगे आगे देखो, होता है क्या?’ असे वक्तव्य केले. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेबद्दल राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. ‘मी आता फार काही बोलणार नाही. काय होणार आहे, हे तुम्हा सर्वांना लवकरच दिसणार आहे’, असे संजय राठोड म्हणाले.

खासदार फोडण्यामागे तुमचा पुढाकार आहे का, या प्रश्नावर, ‘मी आज काहीच सांगणार नाही. काय होणार आहे, हे थोड्याच दिवसांत तुम्हाला दिसणार आहे,’ असे ते म्हणाले. मंत्री संजय राठोड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण होणार असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यवतमाळातही शिवसेना उबाठा गटातील स्थानिक पदाधिकारी लवकरच शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना उबाठाच्या नेत्यांना एक प्रकारे इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister sanjay rathod remark on operation tiger in mahayuti government nrp 78 zws