नागपूर : नागपुरातील माऊंट रोड, सदर येथील येस बँकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (म. न. से.) कार्यकर्त्यांनी मंगळवारी (५ ऑगस्ट २०२५) एका अधिकाऱ्याला चोप दिला. मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला घेराव घातल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे.नागपूरसह राज्यभरात मनसेच्या आंदोलनाची चर्चा नेहमीच होत असते. दरम्यान मंगळवारी दुपारी १२ वाजता दरम्यान मनसेचे नागपूर शहर अध्यक्ष चदु लाडे यांच्या नेतृत्वात येस बँक, माऊंट रोड, सदर परिसरात तीव्र आंदोलन झाले. यावेळी दुपारी मनसेचे ४० चे ५० कार्यकर्ते सदर परिसरातील तिसऱ्या माळ्यावरील बँक परिसरात एकत्र आले. येथे मनसेच्या आंदोलनाचे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांनीही तगडा बंदोबस्त लावला होता.
दरम्यान मनसेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी येस बँक असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गेले. परंतु खबरदारी म्हणून या बँकेचे शटर आधीच बंद करण्यात आले होते. आंदोलकांनी येथे बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्या. दरम्यान पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक व पोलिसांची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आंदोलकांना या बँकेचे एक कार्यालय इमारतीच्या वरच्या माळ्यावर (चवथ्या माळ्यावर) असल्याचे कळले. त्यानंतर आंदोलन तेथे गेले. येथे बँकेच्या एका लोन अधिकाऱ्यांशी आंदोलकांचा वाद झाला. त्यानंतर आंदोलकांनी या अधिकाऱ्याला प्रथम चोप देत घेराव घातला. हा प्रकार निदर्शनात येताच पोलिसांनीही तेथे धाव घेत अधिकाऱ्याला सोडवले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
प्रकरण काय?
इंद्रजित मुळे या ग्राहकाने येस बँकेतून कर्ज घेऊन व्यवसायासाठी जे. सी. बी. विकत घेतले होते. सुरवातीला मुळे यांनी कर्जाचे हप्ते नियमित भरले. परंतु मधात आर्थिक अडचण आल्यावर काही हप्त थकले. त्यानंतर बँकेने जुन्या तारखेत नोटीस देऊन वाहनच जप्त केले. त्यानंतर मी वारंवार बँकेत जाऊन थकीत कर्ज भरण्याची तयारी दर्शवली. परंतु बँकेचे अधिकारी नियम धाब्यावर बसवून आपले वाहन विक्री झाल्याची बतावणी करत होते.
प्रत्यक्षात मी माहिती काढली असता हे वाहन येस बँकेच्या यार्डात उभे असल्याची माहिती आहे. परंतु काही व्यवसायिकाला लाभ पोचवण्यासाठी बँकेचे अधिकारी मला खोटी माहिती घेऊन हे वाहन लाटण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांचे काही विक्रेत्यांशी संगमनत असल्याचा संशयही आंदोलकांनी व्यक्त केला. तातडीने हे वाहन ग्राहकाला आवश्यक कारवाई करून परत न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला गेला.