नागपूरमधील महाराजबाग प्राणिसंग्रहालय हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे सकाळी फिरायला येणाऱ्या तसेच योगा करणाऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जागेत प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा हक्क विद्यापीठाचा आहे, असा निर्णय गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. डॉ. चंद्रकांत रघाटाटे, प्रमोद नरड व इतर नागरिकांनी महाराजबाग प्राणिसंग्रहालय परिसरात नागरिकांना सकाळी फिरू देता येणे शक्य नसेल तर दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर यासाठी विद्यापीठ बांधील नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय नियंत्रण समिती कागदावरच; आयुष्याच्या संध्याकाळी आधारासाठी धावाधाव

नागरिक विरुद्ध महाराजबाग प्रशासन असा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. येथे अनेक वर्षांपासून नागरिक फिरायला तसेच योगासने करण्यासाठी येतात. मात्र, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानंतर प्रशासनाने प्रभातफेरी तसेच योगासनासाठी नागरिकांना मनाई केली. ९ एप्रिल २०२२ पासून प्रभातफेरी नागरिकांसाठी बंद करण्यात आली. कायदा व सुरक्षिततेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. कारण प्रभातफेरीसाठी येणाऱ्या दोन गटात येथे वाद झाला होता. तसेच सकाळी फिरायला येणारे नागरिक पिंजऱ्यातील प्राण्यांना काहीही खायला घालत होते. यात प्राधिकरणाच्या नियमांचेही उल्लंघन होत होते.

हेही वाचा- चंद्रपुरात सारस पक्षी आणण्याचा प्रस्ताव

हा वाद सुटत नसल्याने नागरिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. महाराजबागेतील टीनाचे छत्र आम्हीच बांधल्याने ही जागा आम्हाला देण्यात यावी, असे याचिकेत नमूद केले होते. याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने प्राण्यांचे हित लक्षात घेत प्रभातफेरी बंद करण्याचा निर्णय देत याचिका निकाली काढली. न्या. सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ॲड. अभय सांबरे यांनी बाजू मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning walk prohibited in maharaj bagh zoo area in nagpur dpj