अकोला : अहिल्यानगर येथील रांगोळी प्रकरणावरून मोठा वाद झाला. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मुस्लिमांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचे पडसाद अकोल्यात सुद्धा उमटले आहेत. हा प्रकार जाणून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा असून सखोल चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लीम संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. अहिल्यानगर येथील प्रकारावर मुस्लीम समाजाने तीव्र रोष व नाराजी व्यक्त केली.
अहिल्यानगर येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढलेल्या रांगोळीवरून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या रांगोळीत जाणून ‘आय लव मोहम्मद’ असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेनंतर अहिल्यानगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. निदर्शने, रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. पोलिसांनी ३० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला.
दरम्यान, शहरात विविध अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण होते. बाजारपेठा बंद होत्या. शहरात ठिकठिकाणी गटागटांनी दोन्ही बाजूचे जमाव चर्चा करत थांबून होते. यासर्व पार्श्वभूमीवर अकोल्यात मरकज जमाते अहलेसुन्नत बरारचे अध्यक्ष हाजी मुदाम खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. हा प्रकार जाणून धार्मिक तणाव पसरवण्याचा व मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याच्या हेतूने करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पैगंबर मोहम्मद यांचे नाव रांगोळीत लिहिणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अफवा पसरवून किंवा हिंसा भडकवणाऱ्या असामाजिक तत्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, भविष्यात धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी ठोस प्रशासकीय मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, राज्य सरकारने सर्व समाजात एकात्मता व बंधुत्वाचा स्पष्ट संदेश द्यावा आदी मागण्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी हाफिज मकसूद, मौलाना शहनवाज जुल्फिकरी, मौलाना फिरोज खान, मौलाना रियाज, कच्छी मशीद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया, मुतवल्ली अजाज सूर्या, जावेद खान शबाज खान, हाजी शमश तबरेज यांच्यासह समाजसेवक उपस्थित होते. या प्रकरणामध्ये शांतता राखण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.