नागपूर : नागपूर महापालिकेत या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने उचललेल्या पावलांना करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. येत्या ३० जूनपर्यंत या वर्षीचा मालमत्ता कर ऑनलाईन भरणाऱ्यांना १५ टक्के तर कार्यालयात जाऊन थेट कर भरणा करणाऱ्यांना १० टक्के कर सवलत दिली जाणार आहे.
गेल्या मार्च महिन्यात सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात मालमत्ता कराची वसुली ४०० कोटी करण्याचे उद्दीष्ट महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी राखले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिकेने विविध पावले उचलले असून या कर वसुलीसाठी तिमाहीचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. करदात्यांना कर सवलत देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विशेष योजना जाहीर केली आहे. यात या वर्षाचा मालमत्ता कर येत्या ३० जूनपर्यंत ऑनलाईन भरल्यास त्यावर करदात्यांना थेट १५ टक्के कर सवलत तात्काळ प्राप्त होणार आहे. तसेच महपालिकांच्या कार्यालयांमध्ये जाऊन काऊंटवर या कराचा थेट भरणा केल्यास करदात्यांना १० टक्के सवलतीचा फायदा मिळणार आहे.
भर करण्यासाठी चॅटबॉटचाही वापर
याशिवाय चॅटबॉटच्या माध्यमातूनही कराचा भरणा करता येणार आहे. यासाठी ७३९७८०७३९७ या क्रमांकावर आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून व्हाटस् ॲपवरून हाय केल्यास आपल्याला ऑनलाईन कर भरणा करता येणार आहे. महापालिकेच्या या ऑनलाईन कर भरणा पद्धतीला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सवलतींचा नागपुरातील करदात्यांनी अधिकाधिक फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त चौधरी यांनी केले आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ आणि कर आकारणी नियम क्रमांक ४७मधील तरतुदींनुसार, महापालिकेला संबंधित स्थावर मालमत्ता आणि त्या मालमत्तेतील जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आणि जप्त करण्याचा आणि थकबाकी वसूल करण्यासाठी सार्वजनिक लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्याचा अधिकार आहे. महापालिकेने काही मालमत्तांची सार्वजनिक लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.