नागपूर : शहरात रस्ता दुभाजक आणि चौकात सौंदर्यीकरणासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात येत आहे. त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्चही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पण, झाडे लावल्यानंतर त्यांची स्थिती काय यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा अतिशय कुचकामी आहे. त्याचा प्रत्यय खामला चौक- प्रतापनगर चौक – छत्रपती संभाजी चौकदरम्यानच्या रस्ता दुभाजावरील सुमारे १५० पाम आणि ४१० अशोकाची झाडे कापल्यानंतर आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट-काँक्रिटचे केले जात आहेत. त्यानंतर रस्ता दुभाजकावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येत आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. परंतु, या झाडांची निगा राखण्यात संबंधित यंत्रणा कमी पडत आहेत. अतिशय वर्दळीच्या रस्ता दुभाजकावरील झाडे तोडून कोणीतरी निघून जातो आणि त्याची कोणालाही कल्पना नसते. हे आश्चर्यकारक आहे.

अंतर्गत रिंगरोडवरील खामला चौक ते राजे संभाजी चौक या दरम्यानच्या दुभाजकावर लावलेली सुमारे १५० पाम आणि ४१० अशोकाची झाडे तोडण्यात आली आहेत. या दोन चौकादरम्यानचा हा रस्ता सुमारे २ किलोमीटर आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहे. या झाडांची लागवड आणि देखभालीसाठी सुमारे ५० ते ५५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरपी) सुमारे चार वर्षांपूर्वी ही झाडे लावण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही पामची झाडे १० फूट आणि अशोकाची झाडे १५ फूट उंच वाढली होती, पण काही अज्ञातांनी ती तोडून टाकली आहेत.

५५ लाख पाण्यात

रिंगरोड हा अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. खामला चौक ते छत्रपती संभाजीदरम्यानच्या २ किमीच्या पट्ट्यात १५० पाम वृक्ष लावण्यात आली होती. एका झाडाची किंमत सुमारे २० हजार रुपये होती. तर या दुभाजकावर ४१० पूर्ण वाढ झालेली अशोकाची झाडे होती. एका अशोकाच्या झाडाची किंमत ५ हजार रुपये होती. पाम आणि अशोकाची झाडे लावणे आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सुमारे ५० ते ५५ रुपये खर्च झाला. आता ही झाडे कापण्यात आल्याने तो पैसा वाया गेला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur 150 palm trees 410 ashoka trees cut down on heavy traffic road rbt 74 ssb