“राजकीय पक्षावर किंवा नेत्यांवर टीकाटिप्पणी केली तर कलावंत व वाहिनी असे सगळेच अडचणीत येतात. म्हणून आम्ही राजकीय टिप्पणी टाळतो.”, अशा शब्दात अभिनेते समीर चौघुले व पृथ्वीक प्रताप यांनी वर्तमानातील स्थितीबाबत वास्तवदर्शी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते समीर चौघुलेंसह रसिका वेंगुर्लेकर, पृथ्वीक प्रताप आणि वनिता खरात नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

“आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात लोकांना गंभीर मालिकांपेक्षा विनोदी किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम आवडतात. त्यामुळे ‘हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राजकीय नेत्यांवर किंवा कुठल्याही राजकीय पक्षांवर टीका केली तर कलावंतावर आरोप होतात. त्यामुळे संबंधित वाहिनीसुद्धा अडचणीत येते. यामुळे आम्हा कलावंताना राजकीय पक्षाशी संबंधित किंवा कुठल्याही जाती धर्मासंबंधित टीका करता येत नाही. आमच्या कलावंतावर टीका केली तर नाराज होण्याचा किंवा अडचणीत येण्याचा प्रश्नच येत नाही.” असेही चौघुले म्हणाले.

तसेच, “लोकांना विनोदी मालिका बघायला आवडतात, त्यामुळे नवीन काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. हास्यजत्राच्या कार्यक्रमानंतर आम्हाला अनेक मालिका आणि चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा करण्यात आली असली तरी पहिली पसंती आमची हास्यजत्रा या कार्यक्रमालाच आहे.” असेही त्यांनी सांगितले.

नागपूरच्या तुलनेत मुंबईचे रस्ते वाईट –

नागपूर शहर बरेच बदलले असून येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. येथील रस्ते गुळगुळीत झाले आहेत. मात्र त्या तुलनेत मुंबईतील रस्ते चांगले नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur artists channels are all in trouble if political criticism is made sameer chowghules realistic response msr